Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला तुम्हाला सोडून गेलेल्यांना पराभूत करा!

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे जनतेला जाहीर सभेत आवाहन 


महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे जाहीर प्रचार सभा 


राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा पहिला गुलाल चंदगडमधून : डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर 






चंदगड : मागच्या निवडणुकीत काही लोकांना आम्ही सहकार्य केलं. अनेक ठिकाणी जाऊन त्यांचा पुरस्कार केला. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी त्यांच्या नावाची सूचना केली व त्यांचा सन्मान राखला. बाबासाहेब कुपेकर यांनी या भागाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्यांचं ते सन्मान राखतील, त्यांच्या असंख्य कार्यकर्ते व लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतील अशा अपेक्षा होत्या. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी ते आम्हाला व तुम्हाला सोडून गेले. ज्यांना मोठं केलं, ज्याना तुम्ही शक्ती दिली तेच साथ देत नसतील, तुमची फसवणूक करत असतील तर त्यांना या निवडणुकीत पराभूत करून त्यांना याची शिक्षा द्या असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.



चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांच्या प्रचारार्थ चंदगड तालुक्यातील माणगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पावसामुळे इचलकरंजी येथील सभा उशिरा सुरू झाली. त्यामुळे चंदगड येथील सभेला देखील उशीर झाला. मात्र शरद पवार यांच्या भाषणाने सभेतील मरगळ निघून गेली  व सभेला उपस्थित कार्यकर्ते व जनतेमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून आला. 




यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, राज्याच्या राजकारणात काम करत असताना मला अनेक जीवाभावाचे मित्र भेटले. राज्याच्या हितासाठी काही निर्णय घेताना त्यामध्ये उत्तम सहकारी हवेत. त्यामुळे मी भाग्यवान आहे की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यासारखा मला मित्र भेटला. दुःख एकाच गोष्टीच आहे की आम्हा लोकांना सोडून  ते लवकर गेले. त्यांच्यानंतर संध्यादेवी यांची इच्छा नसताना देखील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचा आग्रह आम्ही त्यांना केला. आमचा शब्द त्यांनी ऐकला. येथील जनतेने पाठबळ दिल्याने ते आमदार झाले. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता देखील स्वर्गीय कुपेकर यांनी ज्या गतीने मतदार संघात काम केले त्या गतीने काम करण्यासाठी विचारी, भक्कम, लोकांशी बांधिलकी ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. हे सर्व गुण डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे येत्या 20 तारखेला तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.



महिला, तरुण, शेतकरी विरोधी सरकारला घालवा! 


शरद पवार यांनी आपल्या भाषणात राज्यातील महायुती व केंद्रातील सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र या लाडक्या बहिणींच्या संरक्षणाचे काय? असा सवाल देखील त्यांनी केला. कारण राज्यात महिलांवरील अत्याचार, मुलींचे अपहरण घटनांमध्ये गेल्या दोन वर्षात वाढ झाली आहे. या कालावधीत 67 हजार 381 अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर 64 हजार महिला व मुली बेपत्ता आहेत, अशी आकडेवारीच श्री पवार यांनी सभेत सादर करत मग तुम्ही मुलींची काय काळजी घेणार, कसली तुमची लाडकी बहीण? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला केला. त्याचबरोबर राज्यात बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज 62 लाखांवर बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण हिंडत आहेत, राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येचा प्रश्न तर गंभीर आहे याकडे देखील पवारांनी लक्ष वेधत राज्यातील शेतकरी हिताची जपणूक करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. महिला, तरुण, शेतकरी यांना सुखाचे दिवस येण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर आणावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले.




राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा पहिला गुलाल चंदगडमधून : डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर 




यावेळी बोलताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सौ नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, 1991 ला आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पाला मंजुरी मिळाली मात्र त्याला निधी मिळत नव्हता. यासाठी माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी त्यावेळी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी तातडीने या प्रकल्पासाठी साठ लाख निधीचा धनादेश पाठवल्याने हा चित्री प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पामुळे आजऱ्यासह गडहिंग्लज तालुका सुजलाम सुफलाम झाला. येथील शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चंदगड मतदारसंघातील विकास कामांची चिंता केली. राज्यात आज लोकशाहीची धूळधाण उडाली आहे. निष्ठा सोडून पक्ष बदलली गेली, हे राज्याच्या दृष्टीने हितावह नाही. राज्यातील जनता ही स्वाभिमानी आहे. येथील जनतेमध्ये निष्ठेची मुळे रुजले आहेत. त्यामुळे येथील जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांना दाखवून दिले. सध्या विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केविलवाणी प्रकार सुरू आहेत, लाडक्या बहिणींना धमकीची भाषा वापरली जात आहे. मात्र अशांना आमच्या लाडक्या बहिणी चांगला धडा शिकवतील. काहीजण 1600 कोटी रुपयांच्या विकासाचा डांगोरा पिटत आहेत त्यांचा 20 तारखेला जनताच हिशोब चुकता करेल. काहीजण तर दडपशाही व गुंडगिरी करत आहेत त्यांना आम्ही प्रसंगी ताईगिरीने उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला. यापुढील काळ चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात सोबत राहूनच आपण घालवू व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल सर्वप्रथम चंदगड विधानसभा मतदारसंघातून पडेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला.



या जाहीर सभेला माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, रामराजे कुपेकर, ठाकरे शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण सह संपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, राजू रेडेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी, संभाजीराव देसाई, दशरथ कुपेकर, अजिंक्य चव्हाण, अकलाक मुजावर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.