ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कारखान्यांची संयुक्त बैठक बोलावण्याची केली मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत, मात्र अद्याप या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेली नसल्याने शेतकरीवर्गात संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या संदर्भात कारखान्यांना सूचना देण्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. त्यामुळे बरेच कारखाने १५ ते २० नोव्हेंबर या दरम्यान सुरू झालेले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी देखील आपला गळीत हंगामाचा प्रारंभ करून गाळप सुरु केला आहे. परंतु साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे ऊसदर निश्चित करून तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर करणे आवश्यक आहे. हा नियम असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप आपल्या साखर कारखान्यांची एफआरपी निश्चित करून त्याप्रमाणे होणारी रक्कम अथवा ऊस दरापोटी एकरकमी दर जाहीर केलेला नाही, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. ऊसाला किती दर मिळणार याची माहिती नसताना देखील केवळ कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत. कारखान्यांकडून अद्याप दराची स्पष्टता नसल्याने शेतकरी अंधारात आहे.
साखर कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे कारखाने सुरू करण्यापूर्वी उसाची एफआरपी किंवा एकरकमी दिली जाणारी रक्कम जाहीर करणे आवश्यक असताना देखील साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व साखर कारखान्यांना परवाने दिल्या आहेत. त्यामुळे आता कारखाने सुरू झाले आहेत. परिणामी संबंधित शेतकऱ्याला आपल्या उसाला किती दर मिळणार आहे हे न कळल्यामुळे त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना तातडीने ऊसदर जाहीर करण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी एक संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, संजय चौगले, वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, सुरेश चौगले, तालुकाप्रमुख युवराज पोवार, बाबासाहेब पाटील, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, सुरज डावरे आदींच्या सह्या आहेत.



