Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर ६ जानेवारीला मोर्चा

आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड वीज ग्राहक संघर्ष समितीचे कार्यकारी अभियंता, प्रांत अधिकारी यांना निवेदन 


                                               छायाचित्र  : अशपाक किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): महारष्ट्र शासनाने महावितरणच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जनतेचा तीव्र विरोध असून गडहिंग्लज उपविभागात हे मिटर बसविण्यात येऊ नयेत, अशी मागणी आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने महावितरणच्या गडहिंग्लज विभागीय कार्यकारी अभियंता तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या विरोधात दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.



निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटर ऐवजी नवी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी अदानी उद्योग समूहाने नोकरभरतीही केली असल्याचे समजते. प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यालयात अशी मीटर बसवली जात आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का? राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला आंदन देण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे असा सवाल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेलाच विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.




एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारने सात अश्वशक्ती वीज पंपाना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे का? कारण सात अश्वशक्तीच्या  वीजपंपाना विद्युत कनेक्शन ऐवजी सोलर सक्ती केली जात आहे. गडहिंग्लज विभागातील डोंगराळ आणि अति पावसाच्या भागात सोलर सक्ती ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.  ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे. अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बाबत जो करार झाला आहे त्याची प्रत मराठी भाषेत जनतेसाठी प्रत्येक गाव चावडीवर लावावी व तालुकास्तरावर शेतकऱ्यांचे मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी, सात अश्वशक्तीच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना सोलरची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारू नये अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



यावेळी शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, अजित बंदी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, मनसेचे  जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, युवराज बरगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत यांच्यासह शिवाजी राऊत, रोहन जाधव, मनीष हावळ, श्रीशैलाप्पा साखरे, बाळासाहेब महाडिक, विनय पाटील सुरेश चव्हाण, युवराज राऊत, विलास यमाटे, उत्तम देसाई, वीरसिंग बिलावर, किरण पाटील, विनायक पाटील, अनिल खाणाई, कृष्णात कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.