कबड्डी, खोखो, रनिंग, गोळा फेक, थाळीफेक आदींचा समावेश
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना प्रशालेत क्रीडा स्पर्धाना गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सुरुवात झाली. या स्पर्धा शनिवार दिनांक 14 डिसेंबर पर्यंत चालणार आहेत.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गडहिंग्लजमधील प्रसिद्ध व्यावसायिक, शशिकांत तेलवेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे.बी. बारदेस्कर हे होते. साधना प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवात भाग घेतला होता .सकाळी आठ वाजता या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली .
दरम्यान प्रत्येक खेळाडूंनी आपल्या खेळात कौशल्य, सामर्थ्य दाखवावे असा संदेश देणारी एक मशाल प्रशालेतील खेळाडूंनी तेवत ठेवली. प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.
कार्यक्रमादरम्यान क्रीडा प्रमुख विनय नाईक व बी. एन. वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. तेलवेकर यांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व पटवून दिले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी 'खेळ आपल्या जीवनाला शिस्त लावण्यासाठी उपयोगी पडते' हे सांगून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. साधनाचे माजी प्राचार्य आर.एन.पटेल यांनी आपल्या मनोगतातून 'खेळ ही एक आरोग्य स्पर्धा आहे आणि यातून आपले ध्येय आणि आपली आव्हाने तुम्ही ठरवा व ती पूर्ण करा' असे सांगितले.कार्यक्रमाचे आभार व्होकेशनल विभाग प्रमुख अनिल देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन जे. के. सोज यांनी केले.
कबड्डी, खो-खो, लांब उडी, गोळा फेक, पळण्याची शर्यत यांसारख्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . स्पर्धा शनिवार पर्यंत चालणार आहेत.


