तत्कालीन चेअरमन डॉ. शहापूरकरांसह २१ जणांवर गुन्हा दाखल
तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार यांचा समावेश
सहकार क्षेत्रात उडाली खळबळ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील २९ कोटी ७१ लाख ८० हजार इतक्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार अशा एकूण २१ जणांवर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. साखर कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी सदर फिर्याद दिली आहे. डिस्लरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी, बॉयलर मोडिफिकेशन, टरबाइन खरेदी, तोडणी व वाहतूक ॲडव्हान्स व प्रशासकीय मंजूरशिवाय केलेले व्यवहार यामधून हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर वगळता इतर कोणत्याही संचालकांना जबाबदार धरण्यात आलेले नाही.
लेखापरीक्षक श्री. फडणीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेकायदा डिस्लरी विस्तारात २ कोटी ३८ लाख ७६ हजार, जुना गिअर बॉक्स खरेदीमध्ये देखील २ कोटी २४ लाख २३ हजार रुपयांचा, बॉयलर मॉडिफिकेशनमध्ये ४ कोटी ४६ लाख १३ हजार, टरबाइन खरेदीमध्ये १ कोटी ३५ लाख ३१ हजार, तोडणी व वाहतूक ॲडव्हान्समध्ये ९८ लाख २१ हजार असे मिळून ११ कोटी ४२ लाख ६४ हजार अपहार व अधिकाराचा गैरवापर करून कारखाना विस्तारीकरण, आधुनिकीकरण व इतर खरेदीमध्ये अनियमितता, आर्थिक व प्रशासकीय मंजुरी शिवाय केलेल्या व्यवहारामुळे कारखान्यास १८ कोटी २९ लाख १६ हजार इतक्या रकमेचे नुकसान झाले असून असे मिळून एकूण २९ कोटी ७१ लाख ८० हजार इतका गैरव्यवहार या साखर कारखान्यात झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी तत्कालीन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक औदुंबर रेवनसिद्ध तांबे, सुधीर शामराव पाटील, महावीर सिद्राम घोडके, मानसिंग अनंतराव देसाई, डिस्टलरी प्रमुख रणजीत बाबुराव देसाई, मुख्य कृषी अधिकारी लक्ष्मण भैरू देसाई, मुख्य लेखापाल बापूसाहेब रामचंद्र रेडेकर, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार श्रीमंत बसाप्पा पुजारी, राजेंद्र नारायण देसाई, संतोष बंडू पाटील, अनिल श्रीकांत भोसले, शिवाजी ईश्वर शिंत्रे, सयाजी नारायण देसाई, बसवराज मल्लाप्पा आरबोळे, रूपाली किरण पाटील, महेश विलास ताडे, विलास पांडुरंग ताडे, यल्लूप्पा कुमाजा बोकडे, हणुमंत दादाराव तोंडे, दादाराव जोतिबा तोंडे आदी २१ जणांविरोधात लेखापरीक्षक फडणीस यांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी या २१ जणांवर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

