चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरात आज दुपारी एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने गोंधळ उडाला. या बसने दोन वाहनांना धडक दिली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बस नियंत्रणात आणल्याने मोठा अपघात टळला. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी व प्रवाशांनी गडहिंग्लज आगाराच्या कारभाराबाबत तसेच गडहिंग्लज- भडगाव मार्गावरील बेशिस्त पार्किंगबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गडहिंग्लज आगारातून सुटलेली एसटी बस भडगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काही अंतरावर असताना अचानक ब्रेक लागला नाही त्यामुळे या बसने समोरील दोन वाहनांना धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच वाहन नियंत्रणात आणल्याने मोठा अपघात टळला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या अपघातानंतर गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावर अर्धा तास वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल हिरण्यकेशी नदीपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भडगाव रोडवर रस्त्याच्या दुतर्फा वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याकडे नागरिकांनी वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे, छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यातच असे अपघात घडल्यास वाहतूक कोंडीत मोठी भरच पडते. त्यामुळे या मार्गावरील बेशिस्त पार्किंगला शिस्त आणण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज आगाराच्या कारभाराबाबत नाराजी
भर शहरात असतानाच अचानक एसटीचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातामुळे नागरिकांनी गडहिंग्लज आगाराच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पाच महिन्यापूर्वी बेरडवाडी- खडीमशीन जवळील चढतीवर गडहिंग्लज आगाराच्या एसटी बसचा ब्रेक निकामी होऊन अपघात घडला होता. यामध्ये पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आगाराने गाड्यांची देखभाल दुरुस्ती करूनच सुस्थितीतील गाड्या सोडाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली.

