अल्पवयीन मुलीवरील अत्याचार घटनेचा केला निषेध
अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी शिक्षा देण्याची केली मागणी
छायाचित्र : अशपाक किल्लेदार गडहिंग्लज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सर्व शाळांच्या मुला -मुलींनी मूक मोर्चा काढत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अत्याचार करणारा नराधम शहजाद शेख याला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. 'आम्ही मुली सुरक्षित नाही आहोत, आम्हाला भयमुक्त जगू द्या' असे फलक हाती घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
चार दिवसापूर्वी गडहिंग्लजमधील एका अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय तरुणाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी एकत्रित येत त्या परप्रांतीय कामगाराला कामावर ठेवणाऱ्या दुकानदाराला जाब विचारत त्याला धारेवर धरले होते. त्यानंतर तब्बल दोन-तीन तास पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून दुकान मालकासह त्या कामगारावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अखेर दोघांवर गुन्हा दाखल केला होता. फरार असणाऱ्या नराधम शहजाद शेख याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती.
दरम्यान, अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या पीडित मुलीने घाबरून खरे सत्य सांगितले नव्हते. दरम्यान, शनिवारी गडहिंग्लजकरांनी तिला धीर दिल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितल्याने धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे त्या परप्रांतीय नराधमाविरोधात शहरात संतापाची लाट पसरली. रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत गडहिंग्लज बंदची हाक दिली होती. या दिवशी कडकडीत बंद पाळून शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, आज शहरातील सर्व शाळांच्या मुला-मुलींनी या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. नराधम शहजाद शेख याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. हातात निषेधाचे फलक व काळे झेंडे घेऊन हा मूक मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला. आम्ही मुली सुरक्षित नाही आहोत, आम्हाला भयमुक्त जगू द्या, अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, थांबणार कधी आम्हा चिमुकल्या मुलींवरील हे बलात्कार, किती असाह्य वेदना या नको तिचा तिरस्कार आता, हवा तिला मोकळा श्वास, या समाजात जगायचा आदी फलक हाती घेऊन या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



