गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे आवाहन
हरळी साखर कारखाना येथे ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या मुलासंदर्भात बैठक

हरळी खुर्द : बैठकीत मार्गदर्शन करताना तहसीलदार ऋषिकेत शेळके. यावेळी डॉ. गीता कोरे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण, विद्याधर गुरबे आदी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक ऊस तोड टोळीतील मुलांचे सर्वेक्षण करून सदर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केले.
![]() |
| हरळी खुर्द : तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचा सत्कार करताना व्हा.चेअरमन प्रकाश चव्हाण. यावेळी डॉ. गीता कोरे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, विद्याधर गुरबे आदी. |
हरळी येथील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना येथे आयोजित ऊसतोड व वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अणण्या संदर्भात बैठकीत बोलत ते होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
स्वागत गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री. शेळके पुढे म्हणाले, १ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत मुख्याध्यापक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने ऊसतोड कामगारांच्या मुलांचे सर्वेक्षण करून अंगणवाडी व मराठी शाळेत १६ डिसेंबर या दिवशी प्रवेशोत्सव प्रशासन व कारखाना प्रतिनिधीच्या सहकार्याने करावा असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत हरीष पाटील यांनी मुलांच्या सर्वेक्षणाची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिता कोरे यांनी ऊसतोड कामगारांसाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाईल. व्हा.चेअरमन प्रकाश चव्हाण यांनी कारखान्याच्या वतीने या सर्वेक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आभार संचालक विद्याधर गुरबे यांनी मानले.
यावेळी गोडसाखरचे संचालक काशिनाथ कांबळे, अशोक मेंडुले, सेक्रेटरी शामराव हरळीकर, महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,कारखाना परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक, कारखान्याचे कर्मचारी, वीटभट्टी कारखान्याचे मालक उपस्थित होते.
महामंडळाचे पैसे ऊसतोड कामगारांचा विमा व त्यांच्या मुलांसाठी खर्च करावा!
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाला महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्याकडून टनाला दहा रुपये दिले जातात. सदर रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना दिला जात नाही. सदरचे पैसे ऊसतोड कामगारांचा विमा व त्यांच्या मुलांसाठी खर्च करावा अशी मागणी संचालक विद्याधर गुरबे यांनी केली. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.



