डॉ. घाळी फुटबॉल लीग : होरायझन, साधना हायस्कुलची विजयी हैटट्रिक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): डॉ घाळी शालेय फुटबॉल लीगच्या दुसऱ्या दिवशी शिवराज इंग्लीश मिडियम स्कुल, जागृती हायस्कूलने गटातील सामने जिंकून आव्हान कायम ठेवले. न्यू होराय़झन स्कुल, साधना हायस्कुलने प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयाची हैटट्रिक केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत.
रोमांचक सामन्यात जागृती हायस्कुलने एम. आर. हायस्कुलला २-१ असे नमवून आव्हान टिकविले. जागृतीच्या ऋतुराज अडसुळे, अनिरुध्द पुजारीने गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली. एम. आरच्या ऋषीकेश भोसलेचा गोल संघाला पराजयापासून दुर ठेवू शकला नाही. शिवराज स्कुलने क्रिएटिव्ह स्कुलचा ४-० असा सहज पराजय केला. शिवराजच्या अरमान यळकुद्रे, शुभम कांबळे यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.
साधना हायस्कूलने रेडकर स्कुलवर ४-० अशी एकतर्फी मात केली. साधनाच्या श्रध्देय साठेने दोन, आदित्य लाखे आणि अक्षय पोवारने प्रत्येकी एक गोल मारला. एम. आर. हायस्कुलने समर्थ बेलेकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर रेडेकर स्कुलला हरविले. जागृती हायस्कुल विरूध्द गडहिंग्लज हायस्कूल हा रंगतदार सामना १-१ असा बरोबरीत सुटला. जागृतीच्या अरमान मुल्ला तर गडहिंग्लजच्या विनायक गोंधळीने गोल केले. ओमकार घुगरी, सुरज कोंडूस्कर, श्रवण पाटील, सागर पोवार, अमर गवळी, सुरज हनिमनाळे, प्रसाद पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.
प्रेक्षणीय हैटट्रिक
होरायझनच्या वर्धन कांबळे याने शिवराज स्कुलविरुध्द हैटट्रिक नोंदवुन ६-० असा मोठा विजय मिळवून दिला. गडहिंग्लज हायस्कूलच्या विनायक गोंधळीने केदारी रेडेकर पब्लिक स्कूलवर तीन गोल नोंदवून धडाकेबाज कामगिरी केली.




