व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाला लाखोंचा भुर्दंड
अज्ञाताच्या कृत्याबद्दल ग्रामस्थांतून व्यक्त होतोय संताप
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दारासमोर लावलेल्या जेसीबी मशीनच्या इंजिनमध्ये अज्ञाताकडून साखर टाकून मशीन नादुरुस्त करण्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी या गावांमध्ये मंगळवारी रात्री घडली आहे. अज्ञाताने मुद्दामहून हा प्रकार केल्याने येथील परशुराम राजू भोई या युवकाला हे इंजिन दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जेसीबी मशीनद्वारे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या या युवकाबद्दल अशी घटना घडल्याने या प्रकाराबद्दल गावात संताप व्यक्त होत आहे. घडलेल्या या प्रकाराची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तेरणी येथील परशुराम राजू भोई हा युवक गेले तीन-चार महिने झाले जेसीबी मशीन आणला आहे. या मशीनद्वारे गावातील तसेच पंचक्रोशीतून विविध कामे घेऊन तो आपला उदरनिर्वाह चालवितो. दरम्यान, मंगळवारी रात्री बुगडीकट्टी रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ सदर जेसीबी त्याने उभी केली होती. सकाळी कामावर नेण्यासाठी हे मशीन सुरु करण्याचा प्रयत्न केला असता सुरु झाले नाही. त्यामुळे इंजिनची तपासणी केली असता त्यामध्ये काहीतरी टाकल्याचे दिसले. संपूर्ण इंजिन उघडल्यानंतर त्यामध्ये साखर टाकल्याचे स्पष्ट झाले. इंजिनमध्ये साखर टाकल्याने सदर जेसीबी मशीन पूर्णतः नादुरुस्त झाले आहे. आता सदर इंजिन दुरुस्तीसाठी जवळपास लाखभर रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे परशुराम याने सांगितले. त्यामुळे जेसीबी मशीन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गावातील युवकाला त्रास देण्याच्या उद्देशाने आज्ञाताने केलेल्या कृत्याबद्दल ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.



