गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
ई केवायसी करताना येणाऱ्या विविध अडचणींकडे वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वारंवार होणारे सर्व्हर डाऊन व काही लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे न उमटणे या अडचणींमुळे गडहिंग्लज तालुक्यातील शासनमान्य रेशन धान्य दुकानातून वेळेत रेशनकार्डवरील लाभार्थ्यांची इ केवायसी होत नसल्याचे दिसत आहे. त्यातच याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असल्याने रेशनधान्य दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाने ई केवायसीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात सध्या रेशनकार्डवर नावे असलेल्या लोकांची ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये वयोवृध्द, मजूरी करणारे कामगार तसेच लहान मुलांच्या हाताचे ठसे योग्य पध्दतीने मशीनवर उमटत नाहीत. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. अशा लोकांकरिता पर्यायी उपाययोजना करून त्यांना नियमित धान्य पुरवठा करणे गरजेचे आहे.
या ई- केवायसीसाठी सध्या लोकांची धावपळ सुरू आहे. मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होणे, काम वेळेत पूर्ण न होणे, यामुळे रेशन धान्य दुकानदाराकडे ई केवायसी करिता लाभार्थ्यांना वारंवार जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी ई- केवायसी करिता रेशन धान्य दुकाना व्यतिरिक्त आपले सरकार केंद्र अथवा इतर ऑनलाईन कामे करणाऱ्या केंद्रांनाही रेशन कार्डधारकांची ई केवायसी करण्यासाठी मान्यता देण्यात यावी जेणेकरून दुकानदाराकडे गर्दी होणार नाही व लोकांचीही होणारी धावपळही थांबेल. तसेच ई- केवायसीची ३१ डिसेंबरपर्यंत असणारी मुदत पुन्हा वाढवावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, उप तालुकाप्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ, दिगंबर पाटील, अनिल खाणाई, संकेत रावण, संभाजी येडूरकर, सोमनाथ कोरी, महेश मोरे, कल्लाप्पा जंगली, आपया भोई, बाळकृष्ण कडुकर, आपया पटणकुडी, साईप्रसाद कोरी, नबीसाब ढपेदार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


