Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पालकांनो पाल्यांवर स्वतःची स्वप्ने लादू नका, त्यांना करिअर घडवण्याचे स्वातंत्र्य द्या!

ज्येष्ठ पत्रकार, संपादक संजय आवटे यांचे प्रतिपादन 


हरळी बुद्रुक येथे सिंबायोसिस स्कूलमध्ये कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळा  




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजच्या नव्या पिढीला विविध माध्यमे उपलब्ध असल्याने ही पिढी त्यावर स्वार झाली आहे. यामुळे त्यांची विचार प्रक्रिया थांबत आहे. या पिढीला माणूस बनविण्याचे आव्हान आज तुमच्या आमच्या समोर आहे. यामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन त्यांना माणुसकी शिकवण्याची गरज आहे, असे सांगतानाच पालकांनी आपल्या पाल्यांवर स्वतःची स्वप्ने लादू नयेत, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.



हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये कृष्णाबाई बळवंत मुजुमदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कृष्णाई पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार होते. स्वागत मुख्याध्यापिका कविता कागीनकर तर प्रास्ताविक डॉ. विद्या येरवडेकर यांनी केले.



यावेळी बोलताना पत्रकार श्री. आवटे पुढे म्हणाले, सर्व जाती धर्मा पलीकडील आपला देश मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. आजच्या नव्या पिढीला विविध माध्यमे उपलब्ध असल्याने  ही पिढी त्यामध्ये गुंग आहे, परिणामी यामुळे त्यांची विचार करण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यांना माणूस म्हूणन जगायचं आहे आणि तो बदल घडवण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. त्यामुळे महिलांनी प्रामुख्याने पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. मुजुमदार कुटुंबाचे हरळी सारख्या ग्रामीण भागात जुळलेली नाळ ही निश्चितच प्रेरक व कौतुकास्पद आहे. हा माणूस मोठ्या तळमळीने हरळी सारख्या एका छोट्याशा गावात शिक्षणाच्या माध्यमातून काही विचार पेरू पहातोय तेव्हा ते उगवलं तर पाहिजे. आपण शेतकरी आहात आपला विश्वास पेरण्यावर असला असतो. अनेकदा काहीतरी गडबड होतं, पाऊस पडत नाही, टोळधाड येते, कीड येते पण आपण पेरायचं सोडतो का, तर आपण पेरत राहिले पाहिजे. त्यामुळे जसा आपण शेतीचं पेरणी करतो तसे विचार पेरण्याचा संस्कार या शाळेच्या निमित्ताने मुजुमदार करत आहेत. त्यामुळे पेरलेले चांगले विचार  उगवण्याची क्षमता फक्त आणि फक्त शिक्षणामध्ये आहे. जगातील सगळ्या महापुरुषांनी शाळा काढल्या. कारण त्यांना देखील खात्री होती जे शाळेमध्ये घडेल ते कुठेही घडणार नाही. त्यामुळे सिंबायोसिसच्या माध्यमातून मुजुमदार यांनी सुरू केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शां. ब. मुजुमदार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी फिरत्या प्रयोगशाळेचे श्री. मुजुमदार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.



यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून शिवम पाटील, आदर्श विद्यार्थिनी सानिका परीट, क्रीडा पुरस्कार हर्षल बामणे, सांस्कृतिक पुरस्कार अक्षरा पाटील यांना देण्यात आला. शालांत परीक्षेत प्रथम श्रेया पाटील, तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम आदर्शिनी लोहार ( साधना हायस्कूल, गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक विभागून श्रेया पाटील ( सिंबायोसिस), आर्या देसाई (वि. दि. शिंदे हायस्कूल गडहिंग्लज), आबासाहेब मुजुमदार गरीब होतकरू पुरस्कार तनुजा लोहार, हर्षल कदम, श्रावणी पताडे, काजल कांबळे, साहिल वाघराळकर यांना देण्यात आला. 


कार्यक्रमास संजीवनी मुजुमदार, डॉ. राजीव येरवडेकर, डॉ. सतीश घाळी, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. शैलेश देशपांडे, माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वातीताई कोरी, अरुण हरळीकर, निलेश कुंबोजकर, सरपंच नीलम कांबळे, पोलीस पाटील रेणुका परीट, माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे, वहिदा मुल्ला यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी यांनी केले. आभार राजेंद्र शेलार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.