Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळमध्ये स्मशानभूमीसाठी आरक्षित जागेत ग्रामपंचायतीकडून दुकान गाळे बांधण्याच्या हालचाली

ग्रामस्थांनी केला विरोध ; उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षकांना निवेदन


स्मशानभूमीव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी सदर जागा न वापरण्याची मागणी  




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील मुत्नाळ या गावात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेत ग्रामपंचायतीकडून दुकान गाळे बांधण्याचा घाट घातला जात आहे. स्मशानभूमी म्हणून आरक्षित असलेली ही जागा अन्य कारणांसाठी वापरण्यात येऊ नये अशी समज  ग्रामपंचायतीला देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे,  पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



निवेदनात म्हटले आहे की, मुत्नाळ गावातील मराठा, कोळी, हरिजन, चांभार, बेरड, लिंगायत, जैन, ब्राह्मण, सुतार, लोहार या समाजातील लोक गेली ८० वर्षापासून गट नंबर ५०८, ५०९, ५०९/ १ ते ७ या जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करतात. सध्याची गावची लोकसंख्या व वाढीव लोकसंख्येचा विचार करता सदर स्मशानभूमीसाठी अस्तित्वात असलेली जमीन ही कायमस्वरूपी आरक्षित असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सदर गट नंबर मधील जमीन ही गावातील विविध धर्म, जाती जमाती  व पोट जातींसाठी स्मशानभूमी म्हणून शासनाने आरक्षित करून ठेवलेली आहे. या गट नंबरच्या सातबारावर इतर हक्कांमध्ये 'सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी' या सशर्त अटीवर ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ग्रामपंचायतीने सदर जमिनीत अतिक्रमण करून दुकान गाळे बांधण्याचा घाट घातला आहे. तसे झाल्यास गावातील सर्व समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत गावसभा बोलावून स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर अंत्यसंस्कार कारणांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी या जागेचा वापर करता येणार नाही असा समज ग्रामपंचायतीला देण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



निवेदनावर माजी सरपंच अण्णासाहेब पाटील, राजगोंडा पाटील, बसगोंडा पाटील, द्राक्षायणी पाटील, शिवलीला पाटील, निजगोंडा पाटील, केंपाणा जाधव, रावसाहेब गड्यानावर, उमेश पाटील, बाबासाहेब सावंत, ऋषिकेश पाटील, मारुती चिगरी, शिवलिंग चौडाज, मलगोंडा पाटील, इराप्प्पा हट्टी, महेश पाटील, नानासाहेब पाटील, भीमगौडा पाटील, बसवंत चनवीर यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.