Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखर कारखान्यांनी ऊस बिल फरकाची रक्कम तातडीने द्यावी!

गडहिंग्लज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 


३० डिसेंबरला चंदगड तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा 


गडहिंग्लज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज विभागातील चंदगड व आजरा तालुक्यातील साखर कारखानदारांनी २०२२-२३ गळीत हंगामातील एफआरपी व्यतिरिक्त फरकाची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गडहिंग्लज येथे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, दिनांक ३० डिसेंबर रोजी चंदगड तालुक्यातील पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, आजरा, चंदगड  तालुका तसेच सीमा भागातील ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांना २०२२-२३ या गळीत हंगामातील एफआरपी व्यतिरिक्त जादाची रक्कम प्रति टन किमान चारशे रुपये द्यावेत अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनाच्या माध्यमातून केले होते. दरम्यान, तब्बल नऊ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला होता. त्यावेळी प्रति टन तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर अदा केलेल्या कारखान्यांनी प्रति टन पन्नास रुपये तर  तीन हजार पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी प्रति टन शंभर रुपये द्यावेत असा तोडगा काढला होता. त्याला शासनाने देखील मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील तीन साखर कारखान्यांकडून प्रति टन पन्नास रुपये रक्कम येणे आहे. संबंधित कारखाना व्यवस्थापनाला समज देऊन रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी  मागणी केली आहे. अन्यथा ३० डिसेंबर रोजी चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.



निवेदनावर राजेंद्र गड्यानावर, राजगोंडा पाटील, केंपाना जाधव, नानासो पाटील, अजित चौडाज, तमाना रामजी, लोहित पाटील, इरगोंडा पाटील, ऋषिकेश पाटील, बसवंत चनवीर, दयानंद जरळी, रावसाहेब गड्यानावर, नंदकुमार गिजवणे, नानासो पाटील, तेजगोंडा पाटील, सुरेश गड्यानावर, बसवराज पाटील, केंपाना गडदार, सुरेश चनवीर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.



चंदगड तालुक्यातील तीन कारखान्यांकडे जादाची रक्कम थकीत


चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व शुगर्स कडून २ कोटी २१ लाख, इकोकेन शुगर म्हाळुंगे १ कोटी ७३ लाख, ओलम शुगर इंडस्ट्रीज राजगोळी खुर्द कारखान्याकडून ३ कोटी ३२ लाख इतकी एफआरपी व्यतिरिक्त जादाची प्रति टन ५० रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बाकी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन संबंधित कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.