Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखान्यासमोर हरळी खुर्द ग्रामस्थांचे आंदोलन

चिमणीतून बाहेर पडणारी राख व मळीमिश्रित पाण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी 


कारखान्याने लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित 


२६ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम ; अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना करावी या मागणीसाठी हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांनी कारखान्याच्या वजन काटा गेट समोर आंदोलन करून कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधले. दरम्यान, कारखान्याने तातडीने आंदोलनाची दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची लेखी हमी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 



साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याचबरोबर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी ओढ्यातून शेतवडीत जात असल्याने पिकांचे देखील नुकसान होत आहे. हे मळीमिश्रित पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघड्यावर सोडले जात असल्याने नागरिक व जनावरांना देखील याचा त्रास होत आहे. त्यामुळे यामुळे मिश्रित पाण्याची देखील योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कारखाना सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घेतलेला नाही याकडे देखील ग्रामस्थांनी लक्ष वेधले.



चेअरमन प्रकाश पताडे, व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, काशिनाथ कांबळे, अशोक मेंडुले, बाळासाहेब देसाई, बसवराज आरबोळे या कारखाना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. मळीमिश्रीत पाण्यासंदर्भात १७ डिसेंबर पूर्वी उपायोजना केली जाईल. तसेच चिमणीतून बाहेर पडणाऱ्या राखेसाठी २६ जानेवारीपूर्वी मशनरी लावण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दिलेल्या मुदतीत उपायोजना न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सदस्य शशिकांत चौगुले यांनी कारखाना पदाधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या.




या आंदोलनात सरपंच साधना आयवाळे, उपसरपंच चंद्रकांत राजे, सदस्या वर्षा गुरव, सुषमा कुंभार, शशिकांत चौगुले, संजय नाईक, रत्‍नाबाई सावरे, राजेंद्र पताडे, राजाराम कुंभार, दयानंद मांगले, औदुंबर पाटील, सुरज पाटील, मयूर बागडी यांच्यासह इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.