महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात राज्यांची दिली जबाबदारी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांची हणबर गवळी उन्नती संस्थेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात राज्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली असून तात्यासाहेब हांडे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कलागते, उपाध्यक्षपदी शामराव खोत व आय. एस. पाटील, सचिवपदी अविनाश खोत, सुरेश मुसळे तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाटील यांची सहसचिवपदी निवड झाली आहे. बसवराज मोदकेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, निवडीनंतर बोलताना कार्याध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी म्हणाले, हणबर गवळी समाजाच्या उन्नतीसाठी या संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केले जाईल. या समाजाचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आवाज उठविला आहे. आता महाराष्ट्र पाठोपाठच इतर राज्यांची देखील जबाबदारी माझ्याकडे सोपविल्याने या पाच राज्यांतील हणबर गवळी समाज एकजूट करून प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांबाबत लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

