Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'कै. श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार' 'स्वयंसिध्दा'च्या कांचनताई परुळेकर यांना जाहीर

२५ डिसेंबर रोजी डॉ. घाळी सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा 


विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांची पत्रकार परिषदेत माहिती 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्त्रियांच्या विकासार्थ उद्योजकता विकास, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य शिबीरे, बचत गट स्थापना, ग्रामीण महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, रोजगार विनिमय केंद्र, कौटुंबिक कायदा सल्ला केंद्र, स्त्रियांच्या अंगभूत कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्त्रियांमध्ये कार्यसंस्कृती व श्रम प्रतिष्ठा रुजवून शेकडो महिलांना स्वावलंबी बनविण्याचा मार्ग दाखविणाऱ्या कोल्हापूर येथील सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळ संचलित स्वयंसिध्दा संस्थेंतर्गत कार्य करणाऱ्या कांचनताई परुळेकर यांना गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'कै. श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार 2024' जाहीर करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्याहस्ते दि. २५ डिसेंबर  रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. घाळी सभागृहात सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.




के. जी. टू पी. जी. शिक्षण देणाऱ्या विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज या शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष, गडहिंग्लज नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका, श्री. वीरशैव को. ऑप. बँकेंच्या माजी अध्यक्ष तसेच इतर अनेक सेवाभावी संस्थेच्या आधारवड म्हणून कै. रत्नमाला घाळीवहिनींना ओळखले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि विशेषकरून स्त्री उध्दारविषयक विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तव्याभिमुख, उपक्रमशील महिलाना कै. श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार दि. २५ डिसेंबर रोजी त्यांच्या जयंती दिनी दिला जातो. यावर्षीचा सदर पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना देण्याचे ठरविले आहे.



यापूर्वी हेल्पर्स ऑफ हँडीकॅपच्या प्रमुख श्रीमती नसिमा हुरजुक, महिला उध्दार कार्याबद्दल डॉ साधना झाडबुके, सहकार क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल श्रीमती शोभाताई कोरे आणि शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या डॉ. नंदाताई बाभूळकर, नागपूर यांना देऊन त्यांना गौरविले आहे.



योगायोग असा की, कै. श्रीमती रत्नमाला घाळीवहिनी व कांचनताई परुळेकर समविचारी आहेत तसेच विचार आणि कर्तृत्व यांचे साधर्म्य त्यांच्यात आहे. श्रीमती घाळीवहिनींच्या कार्याशी संबंधित कार्य करणाऱ्या कांचनताई परुळेकर आहेत. यावेळी प्राचार्य दत्तात्रय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.