ख्रिसमस सणानिमित्त आजरा येथे आलेल्या कुतिन्हो कुटुंबीयावर काळाचा घाला
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजऱ्याजवळ असणाऱ्या परोली बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये ॲड. रोझारिओ अंतोन कुतिन्हो (वय ४८), फिलिप अंतोन कुतिन्हो (वय ४०), लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय ३५) या तिघांचा समावेश आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, ख्रिसमस निमित्त कुतिन्हो बांधव आजरा येथील आपल्या चर्च गल्ली येथील घरी दोन दिवसांपूर्वी आले होते. आज दुपारी नातेवाईकांच्याकडे साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने तो कार्यक्रम आटपून ते दुपारी परोली बंधाऱ्याकडे सहकुटुंब पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहण्याचा आनंद लुटताना बंधाऱ्याच्या वरील बाजूस अडवलेल्या पाण्यात या तिघांचा बुडून मृत्यू झाला. येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत या तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यात बुडाल्याने या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
मृतांमधील लॉईड पास्कल कुतीनहो यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा तर फिलिप यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले तर ॲड. रोझारिओ यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

