वीज ग्राहक संघर्ष समितीच्या बैठकीत निर्धार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर दिनांक ६ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चात दहा हजार वीज ग्राहक उतरवण्याचा निर्धार आज गडहिंग्लज येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे होते.
यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले, हे आंदोलन अदानी सारख्या मोठ्या भांडवलदाराच्या विरोधात आहे. त्यामुळे हे आंदोलन आपल्याला मोठ्या ताकदीने करावे लागेल. गडहिंग्लजमधून ठिणगी पडली की तिचा राज्यभर वणवा पेटतो हे यापूर्वी इथल्या जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराच्या बैठका घेऊन आपण मोठ्या ताकदीने हे आंदोलन पुढे नेऊया असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, हे आंदोलन आता 'आर या पार'च्या पद्धतीने केले पाहिजे. केंद्र आणि राज्य शासन अदानीच्या मुठीत आहे. अदानी जसे सांगतील तसे निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात सर्व देश अदानींच्या ताब्यात दिला जाईल, त्यासाठी आपण आता रस्त्यावर उतरले पाहिजे. यावेळी विद्याधर गुरबे, रमजान अत्तार, सोमगोंडा अरबोळे, दिलीप माने यांनीही कांही सूचना मांडल्या.
प्रत्येक तालुक्यात तयारीच्या स्वतंत्र बैठकांचे नियोजन करून प्रत्येक जिल्हा परिषदेची जबाबदारी निश्चित करण्यात आली. आजरा, नेसरी, चंदगड, गारगोटी येथे बैठका घेऊन भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. दहा हजार आंदोलक आंदोलनात उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. यावेळी अजित खोत, प्रकाश रावळ, संदीप चव्हाण, वसंत नाईक, शिवाजी राऊत, रावसाहेब पाटील, सूरज म्हेत्री, प्रकाश भोईटे, शिवाजी होडगे, सातप्पा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



