वीस वर्षीय लहान भाऊ झाला पोरका ; त्याच्या भवितव्याची सर्वांना चिंता
गंगाराम वंटमुरी याच्या निधनाने संपूर्ण बुगडीकट्टी ग्रामस्थ हळहळले
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन महिन्यापूर्वीच आईचेही हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यामुळे अवघ्या २८ वर्षीय युवकावर पाठीवरील वीस वर्षीय भावाची जबाबदारी पडली. मात्र नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. हे जबाबदारीचे ओझे पेलण्यासाठी नोकरीच्या शोधात मुंबई गाठलेल्या ह्या एकमेव आधाराला देखील काळाने हिरावून नेल्याने लहान भावाच्या डोक्यावरील कुटुंबाचे संपूर्ण छत्रच हरपले आहे. ही दुर्दैवी व सर्वांच्या मनाला चटका लावणारी, सुन्न करणारी घटना गडहिंग्लज तालुक्यातील बुगडीकट्टी या गावात आठवड्यापूर्वी घडली आहे. गंगाराम बसाप्पा वंटमुरी (वय २८) या युवकाचे मुंबईत हृदयविकाराने झालेल्या निधनाने संपूर्ण गाव हळहळले.
बुगडीकट्टी येथील बसाप्पा व सुमित्रा वंटमुरी या दांपत्यांना गंगाराम व राजू ही दोन मुले. यातील गंगाराम हा मोठा मुलगा. गावात थोडीफार असलेल्या शेतीवर हे कुटुंब आपले चरितार्थ चालवायचे. दरम्यान मुले लहान असतानाच बसाप्पा यांचे अचानक निधन झाल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयातच मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. दोन्ही मुलांची जबाबदारी आई सुमित्रा यांच्यावरच पडली. दोन्ही मुले थोडीशी मोठी झाल्यानंतर हे कुटुंब बुगडीकट्टी येथून आपल्या कर्नाटकातील आजोळी स्थलांतर झाले. या ठिकाणी ते वेगळे घर घेऊन स्वतंत्र राहत होते. गेली सहा वर्षे झाली याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. मोठा मुलगा गंगाराम हा देखील कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नोकरीच्या शोधात होता. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. दरम्यान, या दोन लेकरांना आधार असणाऱ्या आईचे देखील नुकतेच तीन महिन्यापूर्वी हृदयविकाराने निधन झाल्याने ही दोन्ही लेकरे आईच्या मायेला देखील पोरकी झाली. त्यानंतर लहान भाऊ राजू याची संपूर्ण जबाबदारी मोठा भाऊ गंगाराम याच्यावर पडली. राजूसाठी गंगाराम हाच आई आणि वडील होता. राजूला काय हवे काय नको ते सर्वकाही गंगारामच बघायचा. ही जबाबदारी सांभाळत असताना होणारी आर्थिक ओढाताण त्याला होत होती. म्हणून त्याने एखादी नोकरी करावी या उद्देशाने पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला गेला होता.
मुंबईतील डिलाई रोडवर पंचगंगा बिल्डिंग येथे असणाऱ्या बुगडीकट्टी ग्रामस्थ मंडळाच्या खोलीत गंगाराम राहिला होता. या ठिकाणी राहून तो नोकरीची शोधाशोधा करत होता. येथे असणारे गावाकडील ग्रामस्थ देखील त्याला नोकरी शोधण्यासाठी मदत करत होते. गंगाराम आपल्या काळजावर दगड ठेवून मुंबईला जरी आला असला तरी त्याचे संपूर्ण लक्ष गावाकडील आपल्या लहान भावाकडे होते. त्याच्या आठवणीने तो व्याकुळ व्हायचा. मात्र काय करणार एकीकडे जबाबदारीचे ओझे व दुसरीकडे नोकरी करून आपले स्वतःचे अस्तित्व उभे करण्याचा दबाव, ह्या दोन्ही तणावाला गंगाराम तोंड देत होता. मात्र येथे देखील नियतीने आपला डाव साधलाच. दिनांक २३ डिसेंबर रोजी गंगारामला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. ही घटना म्हणजे मुंबईतील बैठक खोलीतील त्याच्या मित्र परिवाराला व गावाकडील प्रत्येक ग्रामस्थाला सुन्न करणारी होती. ही खबर कानावर पडताच बुगडीकट्टी मुंबईकर ग्रामस्थांनी गंगारामला उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयाकडे धाव घेतली. बुगडीकट्टी गावात असो किंवा मुंबईत नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणारे शिवाजी गडदाकी, सुधीर पाटील, अरविंद रेडेकर, किशोर नारळीकर, रवी पाटील, वैभव केसरकर या मुंबईकर ग्रामस्थांनी रुग्णालयात जाऊन गंगारामची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व विधी ग्रामस्थांनी डोळ्यात पाणी साठवून पार पाडले. जबाबदारीच्या ओझ्याखाली गंगारामचे झालेले निधन बुगडीकट्टी ग्रामस्थांना चटका लावून गेले आहे. ही घटना आठवड्यापूर्वी जरी घडली असली तरी नियतीने या कुटुंबावर एका पाठोपाठ एक करत साधलेला आपला डाव सर्वांचीच मने सुन्न करणारी आहे.
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली विचारपूस
नोकरीसाठी मुंबईत आलेल्या गंगाराम वंटमुरी याच्या निधनाची बातमी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने मुंबईतील बुगडीकट्टी ग्रामस्थ मंडळाशी संपर्क साधून विचारपूस केली. घडलेल्या घटनेविषयी त्यांनी दुःख व्यक्त करत काही मदत लागल्यास कळवावे असे त्यांनी सांगितले.
राजूला आता आजी-आजोबाचा आधार, त्याच्या भविष्याची चिंता
लहान भाऊ राजूला मोठा भाऊ गंगाराम हाच आधार होता. आई-वडिलांच्या निधनानंतर राजूचे पालकत्व गंगारामकडेच होते. मात्र नियतीने गंगारामला देखील हिरावून नेल्याने वीस वर्षीय राजू संपूर्ण कुटुंबापासूनच पोरका झाला आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी आता आजी-आजोबांवर आली आहे. राजूचे दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. आजी आजोबांना देखील राजूच्या भविष्याची चिंता लागली आहे. नियतीने वंटमुरी कुटुंबालाच आपल्या फेऱ्यात अडकवून आपला डाव साधल्याने हळहळ व्यक्त होत असून गंगारामच्या निधनानंतर पोरका झालेल्या वीस वर्षीय राजूच्या भवितव्याची चिंता ग्रामस्थांना लागली आहे. आई वडील, भावाच्या मायेपासून पोरका झालेल्या राजूला आता पाठबळ देऊन समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.


