नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. यावेळीही अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर काँग्रेस मुख्यालयापासून दिल्लीतील निगम बोध घाटाकडे त्यांचे पार्थिव रवाना झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली.

