ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांचे प्रतिपादन
महागावच्या महात्मा फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ज्या समाजाला माणुसकीची वागणूक दिली जात नव्हती. गावकुसाबाहेरच्या समाजाला बहिष्कृत केले होते. त्या समाजाच्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रचंड ज्ञानाच्या जोरावर प्रकाश आणला. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. दलित समाजात जन्माला येऊन आपल्या ज्ञानाच्या बळावर राज्यघटनेच्या निर्मितीत योगदान दिले. त्यांच्या विचारामुळेच आज देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजली आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा.सुनील शिंत्रे यांनी केले.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. सुरुवातीला प्रा.सुनील शिंत्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार महेश पाटील यांनी मानले.याप्रसंगी उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी प्रा.पी.डी. पाटील, प्रा.संजय मर्णहोळकर, प्रा. मुकुंद मांढरे, प्रा.भीमराव मनगुत्ते, सुभाष सुतार, रमेश कळविकट्टे, शांताराम वागराळीकर, शिवाजी सुतार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




