Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशावर शोककळा.....भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन



नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना  निधन झालं. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाने देशावर शोककळा पसरली असून एक संयमी, शांत स्वभावी, निष्णात अर्थतज्ञ हरपल्याची भावना देशवासीयांनी व्यक्त केली आहे. 



माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. दरम्यान, काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी,  खासदार प्रियंका गांधी तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले. 



मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता.  देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी उत्कृष्टरित्या जबाबदारी सांभाळली. अर्थशास्त्रातील ते उच्चशिक्षित होते. त्यामुळे त्यांना अर्थतज्ञ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतले होते. 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केले होते. 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार तर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.