पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६२ वे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): एकापेक्षा एक गाण्याच्या तलवारील नृत्य आणि विविध बहारदार गाण्यांनी साधना प्रशालेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली. प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन अमाप उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी केले. स्नेहसंमेलनाचे उदघाटन संत गजानन महाराज शिक्षण संस्था, महागावचे संस्था सचिव, संचालक डॉ. यशवंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. पूज्य साने गुरुजी व कोतुमाय यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून साधना ही प्रशाला चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तीनही तालुक्यातील एक उत्कृष्ट इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी हे उज्ज्वल भविष्य घडवत आहेत असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. यानंतर विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला- गुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. सदर स्नेहसंमेलनात बाल कलाकारांनी गायन, नाट्य, वादन, लावणी नृत्य, शेतकरी नृत्य, कथ्थक , गरबा, गुजराती नृत्य इ. नयनरम्य कलाविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. के. सोज, जी. बी. पाटोळे, सौ. के. एन. कोळेकर, एन. डी. शेख यांनी केले. आभार प्रशालेचे पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर यांनी मानले. कार्यक्रमास माद्याळ गावचे माजी सरपंच सुर्याजी घोरपडे, संस्थेच्या संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर, साधना कॉमर्स विभागाच्या प्रभारी प्राचार्या सौ. वैशाली भिऊंगडे, विज्ञान शाखा प्रमुख आर. डी. लांबोर, व्होकेशनल विभाग प्रमुख अनिल देशमुख, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




