गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील डॉ.घाळी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा डॉ. नागनाथ भगवान मासाळ यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे.
डॉ. मासाळ यांचा जन्म मरवडे (ता. मंगळवेढा) येथे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. मूळगावीच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण न्यू कॉलेज, कोल्हापूर तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेतले. त्यांनी त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन कै. अशोकराव शिंदे यांच्या घरी काम करत करत पूर्ण केले.
गेल्या ३० वर्षांपासून डॉ. घाळी महाविद्यालय गडहिंग्लज येथे इंग्रजी विभागाचे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी मिळविली आहे तर ७ विद्यार्थी पीएच.डी चे मार्गदर्शन घेत आहेत. आजपर्यंत त्यांचे ८२ संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. एक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. युजिसी अनुदानित एक संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय परिषदांमध्ये १०० हुन अधिक संशोधन निबंधांचे वाचन केले, अनेक नामांकित विद्यापीठाचे पीएच.डी परीक्षक म्हणून काम पाहतात. तसेच ते गोरगरीब विध्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन सन २००९ सालचा मरवडे भूषण पुरस्कार व सन २०१६ साली महाराष्ट्र राज्य शाळा कृतीसमितीच्या वतीने कृतिशील प्राध्यापक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सन २०१६ ते २०२१ पर्यंत त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्थायी समिती सदस्य म्हणून कार्य पाहिले आहे. त्यामुळे या सर्व कारकिर्दीचा उपयोग त्यांना अधिसभा सदस्य म्हणून काम पाहताना होईल. या निवडीसाठी त्यांना विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी बी.सी.यु.डी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, माजी प्राचार्य सी. आर. गोडसे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले यांचे सहकार्य लाभले.



