Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्याच्या मुलाने केले कष्टाचे चीज !

सुळेच्या अमोल कळविकट्टे यांचे सी.ए.परीक्षेत यश





गडहिंग्लज (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, प्रामाणिक प्रयत्न व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुळे (ता. आजरा) येथील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट' यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सी. ए.)परीक्षेत यश संपादन करत यशाला गवसणी घातली आहे. अमोल सुरेश कळविकट्टे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

      


यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळविण्यासाठी झगडल्याशिवाय पर्याय राहत नाही. या उक्तीनुसार प्रयत्न करणाऱ्या अमोलचे वडील सुरेश कळविकट्टे हे अल्पभूधारक शेतकरी असून आई सोनाताई ही गृहिणी आहे. भाऊ भास्कर व वहिनी सुप्रिया हे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील शिटटयाळी. तेथे शिक्षणाची चांगली सोय नसल्याने व आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी वडीलांनी सासरवाडी सुळे येथेच राहण्याचा निर्णय घेतला. मुलांनी चांगले शिकावे यासाठी सततची त्यांची धडपड होती.

      


मुळातच लहानपणापासून अभ्यासात हुशार आसणाऱ्या अमोलचे प्राथमिक शिक्षण सुळे येथील प्राथमिक शाळेत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व जुनिअर कॉलेजमधून, तर डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज येथून वाणिज्य विभागातून पदवी प्राप्त केली. आई-वडिलांची मुलाने शिकून मोठे होण्याची इच्छा व अमोलनेही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदवी झाल्यानंतर विद्येचे माहेरघर असणारे पुणे गाठले. तेथे गेल्यावर अमोलने सैन्य दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली पण मावशी व काकांनी सी.ए. होण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययनावर भर देत अभ्यास सुरू ठेवला. दोन परीक्षेत अपयश आले पण खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले व  तिसऱ्या प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण होत केलेल्या कष्टाचे चीज झाले. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी धडपडणाऱ्या युवकांसाठी अमोल हा नक्कीच आदर्श आहे. त्यांनी मिळालेल्या यशाचे व त्याच्या कष्टाचे, संघर्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


निकाल लागल्यानंतर खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे अभ्यास केला. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले. आई - वडीलांचा आशीर्वाद, काका मावशीचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच मी या यशापर्यंत पोहचलो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आल्यास खचून न जाता स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा, यश नक्की मिळते.

- अमोल कळविकट्टे 

चार्टर्ड अकाउंटंट ( सी.ए.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.