Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील एका खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर व प्रशासक लाचलुचपतच्या 'जाळ्यात'

शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्यासाठी अठरा हजार रुपयांची लाच





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील स्वराज्य हॉस्पिटलचे डॉ. अजित वसंतराव पाटोळे ( रा. साधना हायस्कूलजवळ, संभाजीनगर, गडहिंग्लज) व तेथील प्रशासक इंद्रजीत शिवाजीराव पाटोळे (रा. मिसाळ चाळ, आझाद रोड, गडहिंग्लज) या दोघांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने गडहिंग्लज शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत या दोघांवर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचा मित्र दिनांक १० जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डाव्या खुब्यास मार लागला होता. दिनांक ११ जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दिनांक १३ जानेवारीला गडहिंग्लज येथील स्वराज्य हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटोळे यांनी ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे ठरवून सदरची शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत करण्यासाठी वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यातील तक्रारदार यांनी दिनांक १५ जानेवारी रोजी दहा हजार रुपये डॉ. अजित पाटोळे यांना दिल्यानंतर दिनांक १६ जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. सदरची शासकीय योजना व या योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती अठरा हजार रुपये देण्याचे ठरले होते. यातील उर्वरित आठ हजार रुपयांची लाच प्रशासक इंद्रजीत पाटोळे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. 


 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस हवालदार सुनील घोसाळकर, संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदीप पवार, सहायक फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.