गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे दोन संघ; स्पर्धेची सर्वांना उत्कंठा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर स्पोट्रर्स असोसिएशनमार्फत होणाऱ्या गडहिंग्लज ग्रामीण लीग फुटबॉल स्पर्धेसाठी यावर्षी पाच संघांनी नोंदणी केली आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अ, गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन ब, काळभैरी रोड फुटबॉल क्लब, संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लब आणि सॉकर ट्रेनिग सेंटर यांचा समावेश आहे. यंदाही गडहिंग्लज युनायटेडने आपले दोन संघ मैदानात उतरविले आहेत. स्पर्धेची स्थानिक शौकिनांत उत्कंठा आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यासाठी केएसएमार्फत ही फुटबॉल लीग घेतली जाते. संघ आणि खेळाडू नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ऑनलाईन पध्दतीने नोंदणी झाली. संघ नोंदणी, लीग प्रवेश फी आणि खेळाडू नोंदणी असे प्रत्येक संघाला आठहजाराहून अधिक रक्कम भरावी लागली. गतवर्षी चार संघानी नोंदणी केली होती. यंदा यात एकाने भर पडली. दर शनिवारी आणि रविवारी साखळी पध्दतीने या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेचा सर्वाधिक सहा वेळा विजेता गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने नेहमीप्रमाणे अ आणि ब असे दोन संघ कायम ठेवले आहेत. या संघाचे कोल्हापूरात आठ खेळाडू मानधन तत्वावर खेळत असूनही आपले दोन्हीं संघ राखत तब्बल ३६ खेळाडूंची नोंदणी करत संघ राखले आहेत. काळभैरी रोड क्लब, सॉकर ट्रेनिंग सेंटर यांचे प्रत्येकी एक संघ खेळणार आहेत. भिमनगर परिसरातील दोन संघानी एकत्र येऊन सयुंक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर क्लब म्हणून नोंदणी केली आहे. खेळाडू नोंदणी फुटबॉल क्षेत्रात उत्सुकता होती. नोंदणीचा ठप्पा संपल्यानंतर सर्वांना स्पर्धेची उत्कंठा लागून राहिली आहे.

.jpg)