![]() |
| मुंबई : नमिता कीर व अशोक नायगावकर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना सदानंद पुंडपाळ. सोबत सांडू ब्रदर्सचे आनंद सांडू. |
श्री. पुंडपाळ यांनी कोकणामध्ये सुमारे पस्तीस वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी अकरा वर्षे दैनिक सकाळमध्ये पत्रकार म्हणून व ॲग्रोवन मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणूनही काम केले असून दै. सकाळ व चंदगड येथील सत्यघटना साप्ताहिकातही सदर लेखन केले आहे. सुमारे तीस दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
याचबरोबर त्यांनी कथा, कविता, विडंबन कविता, कादंबरी, चरित्र, वैचारिक स्फूट, दोहे, चारोळी, व्यक्तीचित्रे अशा विविध विषयांवर लिखाण केले असून त्यांची एकूण अठ्ठावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील अनेकांना विविध संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले असून वाचकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
त्यांच्या 'हिरवी राने गाती गाणे' या बालकविता संग्रहाला कणेगाव, जिल्हा सांगली येथील कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठानचा कै. विकास पाटील साहित्य स्मृतिपुरस्कार, गारगोटी येथील कै. आकुबाई जठार स्मृतिपुरस्कार, सप्तर्षी शैक्षणिक व सामाजिक संस्था, मंगळवेढा, सोलापूर यांच्यातर्फे मातोश्री सौ. काशीबाई घुले साहित्य पुरस्कार व चेंबूर (मुंबई) येथील दत्तात्रेय कृष्ण सांडू राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असे चार पुरस्कार मिळाले आहेत.
चेंबूर (मुंबई) येथील दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक उपक्रमांना साह्य करणारी नोंदणीकृत संस्था आहे. त्यांच्या मार्फत मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध साहित्य प्रकारच्या पुस्तकांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी बालसाहित्यासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ यांच्या 'हिरवी राने गाती गाणे' या बालकवितासंग्रहाला जाहीर झाला होता, तो चेंबूर येथील बालविकास संघाच्या सभागृहात प्रतिष्ठानचे आनंद सांडू यांच्या उपस्थितीत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा श्रीमती नमिता कीर व सुप्रसिध्द कविवर्य अशोक नायगावकर यांच्याहस्ते श्री. पुंडपाळ यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सांडू परिवारातील अनेक सदस्य, ग्रंथालीचे दिनकर गांगल व इतर अनेक साहित्यिक मान्यवर उपस्थित होते.


