Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संविधान बदलण्याची भाषा आम्ही कदापी खपवून घेणार नाही !

ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचा इशारा


गडहिंग्लज येथे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संविधान पूजन कार्यक्रम  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): ज्या भारतीय संविधानाने देश एकसंध ठेवण्याचे काम केले तेच संविधान देशातील भाजप सरकार बदलण्याची भाषा वारंवार करत आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील अनुउद्गार काढले जात आहेत, ही बाब देशासाठी शोभनीय नसून आम्ही हे कदापि सहन करणार नाही. जातीयवादी पक्षांचा हा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिला.




शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर संविधान पूजन कार्यक्रम पार पडला. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना व भीमशक्ती संघटना यांच्यावतीने संविधानाच्या प्रतींचे पूजन करून भारत मातेला वंदन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख प्रकाश रावळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. 



यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेची रचना करताना सर्व जाती-धर्मांना समान न्याय दिला आहे. त्यामुळे देश आजपर्यंत एकसंध राहिला आहे. देशातील सर्व जनतेला एकसंध ठेवण्याचे काम ज्या राज्यघटनेने केले आहे त्याच राज्यघटनेला संपविण्याची भाषा आज काही जातीयवादी पक्ष वारंवार करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही अनुद्गार ते काढत आहेत. घटना संपविण्याच्या गोष्टी आम्ही भारतीय नागरिक म्हणून कदापी सहन करणार नाही. या विरोधात भीमशक्ती व शिवशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत एकत्रित काम केलो आहोत. या चुकीच्या संकल्पने विरोधात यापुढे देखील या दोन्हीही शक्ती एकमेकांच्या हातात हात घालून काम करतील.



आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, देशात भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या दहा वर्षात संविधानावर आघात करण्याच्या विविध घटना घडल्या आहेत. या सरकारने या देशातील लोकशाही घालवण्याचा डाव सुरू केला आहे. मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही. लोकशाही संपवण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.



यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, तालुका युवा अधिकारी सागर हेब्बाळे, रोहित डावरे, शहर समन्वयक तेजस घेवडे, संभाजी येडूरकर यांच्यासह शिवसैनिक व भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.