ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांचे प्रतिपादन
गडहिंग्लजला 'सारथी' तर्फे कार्यक्रम संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संपूर्ण जगाने स्विकारलेला महात्मा गांधींचा विचार हाच शाश्वत आहे. अशा विचारातून क्रांती होते. क्रांतीसाठी शस्त्राची गरज नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. जे. बी. बारदेस्कर होते.
गडहिंग्लज येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. माने पुढे म्हणाले, आजच्या राजकर्त्यांमध्ये महात्मा गांधीचे नाव घेणे ही एक फॅशन होऊन बसली आहे. सत्ता हे सेवेचे साधन आहे. सत्तेचा दूरूपयोग होत असेल आणि सामान्यांना त्याचा त्रास होत असेल तर सत्य आणि अंहिसेच्या माध्यमातून उलथून टाकता येते हे सत्य महात्मा गांधीनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. संपूर्ण जगाने गांधीचा विचार स्विकारला आहे, हे लक्षात घेतले तर गांधीजींच्या विचाराला विरोध करणारे अनेकजण पहायला मिळतात. त्यांचा तिरस्कार करतात. गांधीचा विचार मारण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु हा विचार कधी मरणार नाही. समाजात शोषक आणि शोषित अशा दोन घटकात संघर्ष असून अशा काळात मध्यमवर्ग मात्र संवेदनहीन झाल्याने एक प्रकारची अस्वस्थता पहायला मिळते. जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. द्वेष फैलावला जात आहे. अशा काळात आपण जागृकतेने भोवताली घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला पाहिजे. गांधीचा विचारच संपूर्ण जगाला तारणारा आहे.
प्रा.जे.बी.बारदेस्कर यांनी आपल्या मनोगतात गांधींच्या विचाराचे पाईक व्हावे. केवळ प्रतिमा पूजन आणि भाषणबाजी करून भागणार नाही तर कृतिशिलतेने काम करण्याची गरज आहे. यावेळी राजन पेडणेकर, कल्याणराव पुजारी, अमर चव्हाण, श्रीमती अंजनाताई रेडेकर, अरविंद बारदेस्कर, सौ. श्रद्धा शिंत्रे, उज्वला दळवी, ज्ञानराजा चिघळीकर, प्रकाश भोईटे, दशरथ दळवी, डॉ. अनिल पाटील, काशिनाथ तनंगे, सुभाष कोरे, नवनाथ शिंदे, शिवाजीराव होडगे, अनिल उंदरे, अरूणा शिंदे, संग्राम सावंत यांच्यासह महात्मा गांधी विचारमंच, राष्ट्रसेवादल, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सखी महिला मंडळ, सवित्रीबाई महिला स्पोर्ट्स अकादमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपत देसाई यांनी पाहूण्याचा परिचय करून दिला. सुरेश दास यांनी सुत्रसंचालन तर साताप्पा कांबळे यांनी आभार मानले.




.jpg)