मनसेने दिला उत्पादन शुल्क विभागाला इशारा
जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील भडगाव रोडवरील आनंदविहार अपार्टमेंट मधील नियोजित बारला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे निवेदनातून केली आहे. बारला परवानगी दिल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भडगाव रोडवरील आनंदविहार अपार्टमेंट मधील नियोजित बारबाबत नागरिकांनी लक्ष वेधले अपार्टमेंटमध्ये बार होणेसाठी तीव्र विरोध दर्शविला आहे. संबंधित बिल्डरच्या नियोजित बारमुळे अपार्टमेंटमधील सुरक्षीतता पुर्णपणे धोक्यात येणार आहे. अपार्टमेंटमध्य वास्तव्यास असलेल्या बहुतांशी कुटुंबातील कुटूंब प्रमुख भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत तसेच बहुतेक कुटुंबे ही वीर नारी आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश कुटुंबाचे कुटुंबप्रमुख हे भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असताना नियोजित बारमुळे त्यांच्या कुटुंबियाचे अस्तित्व हे पुर्णपणे नशेखोरांच्या ताब्यात दिल्यासारखे होणार आहे. ही बाब पुर्णपणे विचार करावयास लावणारी व गंभीर आहे. याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. तरी संबंधित बारसाठी आपणाकडून परवानगी देणेत येवू नये. यासंबंधी याचा गांभीर्याने विचार होवून याचेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिका-यांची गडहिंग्लज येथे आठ दिवसाच्या आत बैठक होवून संबंधित बारची परवानगी थांबविणेसाठी योग्य ती कार्यवाही व्हावी. मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपाध्यक्ष विनायक आवळे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहराध्यक्ष केम्पन्ना कोरी यांच्यासह प्रा. पी. डी. पाटील, संग्राम सावंत, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, उज्वला दळवी व आनंद विहार मधील रहिवाशी उपस्थित होते.

