Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीचे माजी सैनिक संभाजी कुरळे यांचे हलकर्णी महावितरण कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण मागे

महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून काढला सुवर्णमध्य 


आजी-माजी सैनिक संघटना व तेरणी ग्रामस्थांची शिष्टाई 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बोरवेलसाठी विद्युत कनेक्शनची रीतसर मागणी करून देखील ११ महिने उलटले तरी कनेक्शन मिळत नसल्याने गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील माजी सैनिक, अल्पभूधारक शेतकरी संभाजी कुरळे यांनी न्याय मिळण्यासाठी हलकर्णी येथील  महावितरण कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आज सायंकाळी मागे घेतले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी, आजी-माजी सैनिक संघटना व पेरणी ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सुवर्णमध्य काढण्यात आल्याने श्री. कुरळे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. 




माजी सैनिक संभाजी कुरळे यांनी तेरणी येथील गट नंबर ९३९ या  आपल्या २५ गुंठे जमिनीत साडेचार लाख रुपये खर्च करून बोरवेलची खुदाई केली आहे. पाणी उपशासाठी विद्युत कनेक्शन मिळावे यासाठी रीतसर महावितरण कार्यालयाकडे पैसे देखील भरले आहेत. मात्र ११ महिने उलटले तरी त्यांना विद्युत कनेक्शन मिळालेले नाही. डीपीवर लोड शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून बोरवेलला कनेक्शन देता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले असून महावितरणकडून आता त्यांना सोलारचा पर्याय दिला आहे. मात्र श्री. कुरळे यांच्या बोरवेलची खोली सहाशे फूट खोल असल्याने सोलारने पाणी उपसा होईल का नाही ?  या प्रश्नाचे उत्तरच त्यांना मिळत नसल्याने शेतीकडे केवळ त्यांना बघत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अखेर त्यांनी आजपासून  हलकर्णी येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला गडहिंग्लज तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी व तेरणी ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, सरपंच रमेश पुजारी, माजी सरपंच करवीर उथळे यांनी उपोषणस्थळी भेट देत श्री. कुरळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.


गडहिंग्लजमधील मोर्चादरम्यानही पदाधिकाऱ्यांनी वेधले होते महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष 


माजी सैनिक संभाजी कुरळे यांच्या उपोषणा संदर्भात गडहिंग्लजमध्ये आज झालेल्या स्मार्ट व प्रीपेड मीटर विरोधातील मोर्चादरम्यान चर्चा करताना महावितरणच्या अधिकाऱ्यांचे जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी आक्रमकपणे लक्ष वेधले. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी देखील आक्रमक होत माजी सैनिकाच्या या उपोषणाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या बोरवेलसाठी तातडीने विद्युत कनेक्शन देण्याची मागणी केली.


 उपोषणस्थळी गडहिंग्लज वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट 


दरम्यान, आज सायंकाळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री. आडके, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी यांनी उपोषणस्थळी येत माजी सैनिक श्री. कुरळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, तेरणीचे सरपंच रमेश पुजेरी व ग्रामस्थ यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर सुवर्णमध्ये काढण्यात आला. चर्चेनंतर अखेर माजी सैनिक संभाजी कुरळे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. 



यावेळी तेरणीचे सरपंच रमेश पुजेरी, संतोष इंगवले, रवींद्र इंगवले, भूषणबाबू इंगवले, एकनाथ चव्हाण, पवन कुरळे, प्रशांत कुरळे, दूंडाप्प्पा देसाई, स्वप्निल इंगवले, अण्णाप्पा नाईक यांच्यासह तेरणी आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.