पुणेरी पलटणचा प्रो-कबड्डीपट्टू आर्यवर्धन नवाळे
गडहिंग्लजच्या जागृती प्रशालेत क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
गडहिंग्लज (प्रतिनिधी): खेळ व व्यायाम यांना मानवी जीवनात खूप अनमोल अनन्यसाधारण महत्व असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानावर कसब दाखविल्यास शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खेळाडू कणखर बनतो. खेळामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये धाडस, नेतृत्व संघभावना, आत्मविश्वास व सहकार्यवृत्ती असे गुण विकसित होतात. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात मेहनतीनेच कर्तृत्व सिद्ध करता येते. मैदानावर सातत्य, कष्ट, कठोर मेहनतीवर फोकस ठेवल्यास खेळांतून करिअर साधता येते असे प्रतिपादन पुणेरी पलटणचा स्टार कबड्डीपट्टू आर्यवर्धन नवाळे यांनी जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते.
जिमखाना विभाग प्रमुख संपत सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय सचिन मगदूम यांनी करून दिला. शालेय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू नैतिक तेलवेकर, सुरज खमलेट्टी, प्रज्वल पन्हाळकर,तन्मय कोरी, रामदास गोरुले, प्रीतम दिवटे, कु.राजस्विनी पाटील, कु. अन्वी मगदूम ,राज अमान्नावर, कु. तेजस्वी शिंदे, श्रेयस पाटील, नकुल भाट, कु. केतकी कोंडस्कर ,आर्यन पाटील, वेदांत कडूकर, रणवीर भालकर या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. सतीश घाळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जागृतीने आजतागायत वैभवशाली क्रीडा परंपरा जोपासलेली आहे. ही कौतुकाची बाब असून खेळाशिवाय आज शिक्षणाला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर खिलाडूवृत्ती जोपासावी. बौद्धिक व शारीरिक विकासाच्या समन्वयातूनच खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास होतो.
वार्षिक क्रीडा महोत्सवातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रिले, बुद्धिबळ, कॅरम व मैदानी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवलेले सनी चोथे, कु. वैष्णवी कुंभार, प्रणित घोडके, कु.अंकिता जाधव यांना प्रमाणपत्र व आकर्षक चषक डॉ. सतीश घाळी, अरविंद कित्तुरकर, आर्यवर्धन नवाळे, रमेश कोरवी,अमर नवाळे, प्राचार्य विजयकुमार चौगुले, डॉ. दत्ता पाटील, श्रीरंग तांबे,डॉ. सुधाकर शिंदे, श्रीमती माला आजरी, प्रल्हाद मगदूम, उमेश सावंत, शिवाजी अनावरे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.गिता पाटील यांनी तर आभार प्रकाश हरकारे यांनी मानले.





