हलकर्णी येथे मोफत आरोग्य रथाचा शुभारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागात रुग्णांना वय आणि वृद्धत्वामुळे हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे अवघड असते. लहान मुलांसहमहिला रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत जाणे कठीण असते. त्यांची गावातूनच सोय व्हावी यासाठी कै केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज यांच्यामार्फत मोफत आरोग्य रथ सुरू करण्यात आला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
हलकर्णी (ता.गडहिंग्लज) येथे मोफत आरोग्य रथाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच योगिता संगाज म्हणाल्या, महिन्याच्या दर मंगळवारी गावातून हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य रथ सेवेचा ग्रामीण रुग्णांना निश्चितच फायदा होईल. मंगळवारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी शिवशक्ती मेडिकल, मल्लिकार्जुन मेडिकल येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन केले.
यावेळी उपसरपंच सलीम यमकनमर्डी ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील, भाऊ काळोजी, भागोजी गवळी, विनायक पाटील आडव्याप्पा पाछापुरे, शिवाजी कुराडे, किरण पाटील, राजू मुनोळी, आवाना भोसले, सुनील चौगुले, भीमा सासगिरी, बाळाप्पा धनगर, पप्पू कागिनकर, नामदेव सुतार, सुशांत नौकुडकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


