Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यातील 10 केंद्रांवर दहावी बोर्ड परीक्षेला सुरळीत सुरुवात

एकूण ३ हजार ८४ परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश


कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बैठे, भरारी पथके व पोलीस बंदोबस्त : गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेला मराठी विषयाच्या पेपरपासून आज सुरळीतपणे प्रारंभ झाला आहे. गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.



गडहिंग्लज तालुक्यात हलकर्णी, मुंगुरवाडी, महागाव, बटकणगले, नेसरी, नूल, कौलगे, गडहिंग्लज हायस्कूल, साधना हायस्कूल, जागृत हायस्कूल अशा एकूण १० केंद्रांवर ३ हजार ८४ इतके विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात बोर्ड परीक्षा द्यावी असे आवाहन परीक्षा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 




यापूर्वी दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा संपल्या असून, लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे व भरारी पथके : गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ 



गडहिंग्लज तालुक्यातील एकूण १० परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे परीक्षेला प्रारंभ झाला आहे. कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर बैठे व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असून पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.