वेळीच प्रकार लक्षात आल्याने आर्थिक नुकसान व मनस्ताप टळले
जाळ्यात अडकविण्यासाठी ऑनलाइन भामटे लढवितात विविध शक्कल; नागरिकांनीच सतर्क राहण्याची गरज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव येथील दैनिक 'तरुण भारत संवाद' चे पत्रकार प्रकाश चौगुले यांचा व्हाट्सॲप ऑनलाइन भामट्यांनी हॅक केला. ही बाब पत्रकार श्री चौगुले यांना वेळीच लक्षात आल्याने आर्थिक नुकसान व होणारा मनस्ताप टळला. यापुढे इतरांनी देखील या ऑनलाईन भामट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चार दिवसापूर्वी ( रविवार दिनांक १६ ) पत्रकार प्रकाश चौगुले यांना त्यांच्या नावाने काही व्हाट्सअप ग्रुपवर एक फाईल सेंड झाल्याचे काही ग्रुप मेंबरनी त्यांना सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी असल्या कुठल्याही प्रकारची फाईल सेंड केलेली नव्हती. त्यामुळे त्यांना व्हाट्सअप हॅक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या संदर्भात सायबर हेल्पलाइन नंबर वरून संपर्क साधत त्याची कल्पना त्यांना दिली. त्यानंतर आपल्या मोबाईल मधील फोन पे, गुगल पे हे ॲप डिलीट करून टाकले. दक्षता म्हणून व्हाट्सअपने त्यांच्या त्या नंबरवरील व्हाट्सअप सध्या बंद ठेवले आहे.
सध्या सायबर भामट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. डिजिटल अरेस्ट, बनावट फाईल पाठवून व्हाट्सअप हॅक करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. या सायबर क्राईमला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार कडक उपाययोजना राबवत आहे. विविध प्रसारमाध्यमांद्वारे व टेलिकॉम कंपन्यांद्वारे या सायबर क्राईम पासून सावरण्यासाठी सतर्क देखील केले जात आहे. तरीदेखील हे सायबर भामटे वेगवेगळी शक्कल लढवून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हाट्सअप ग्रुपवरील प्रत्येकानी सावध राहण्याची गरज
प्रत्येक जण आज या ना त्या व्हाट्सअप ग्रुपवर जॉईन असतो. ग्रुप सर्च करत असताना काही बनावट फाईली देखील सायबर भामट्यांकडून शेअर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये PM kisan. Apk, Gharkul yojana. Apk, CSC CENTER. APK, SBI Rewards. APK, MGB Rewards. APK, solar Pump list. Apk अशा फाईली असू शकतात. या फाईल इन्स्टॉल अथवा उघडू नये. ह्या फाईली डाऊनलोड किंवा इन्स्टॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलचे नियंत्रण जाऊन मोबाईल हॅक होतो. यामुळे मोबाईल मधील फोन पे, गुगल पे, पे -टीएम, अमेझॉन यासारखे ॲप हॅक करून बँक खाते रिकामे केले जाते. बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर डिलीट करून टाकतात त्यामुळे याची माहिती संबंधितांना लवकर समजत नाही. याबाबत सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जागृती केली जात आहे. आपली फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 अथवा cybercrime. gov. in या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे वरील अशा फाईली उघडण्यापूर्वी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा अनर्थ घडू शकतो. खात्री केल्याशिवाय अशा फाईलीवर क्लिक करू नये. आणि इतर ग्रुप मेंबरनी देखील अशा फाईल इतरत्र सेंड करणे टाळावे. शंका आल्यास अशा फाईल ग्रुप ॲडमिनने डिलीटच करून टाकावे.
घरात लहान मुलांकडे मोबाईल देणेही धोक्याचे ठरू शकते
आपल्या घरातील लहान मुलांना मोबाईल देताना देखील काळजी घेण्याची फार गरज आहे. मुले मोबाईल मध्ये विविध गेम्स डाऊनलोड करताना विविध परमिशनसना allow करतात तसेच व्हाट्सअप ग्रुपवरील काही फाईलस देखील अजाणतेपणे उघडतात. त्यामुळे आपला मोबाईल हॅक होऊ शकतो.
व्हाट्सअप ग्रुप मेंबर्सनी मला माझ्या पोस्टची कल्पना दिल्याने अनर्थ टळला!
मला काही व्हाट्सअप ग्रुप वरील मेंबर्सनी मी पोस्ट केल्याचे सांगितल्याने माझा व्हाट्सअप हॅक झाल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने मी सतर्कता बाळगली. सायबर हेल्पलाइनला कल्पना दिली. मोबाईल मधील महत्वाचे ॲप्स डिलीट केलो. ग्रुपवरील मेंबर्सच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार माझ्या लक्षात आला. त्यामुळे इतरांनी देखील व्हाट्सअप वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
प्रकाश चौगुले
पत्रकार

