पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, माजी विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती
छायाचित्र : अशपाक किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालय येथे मुलांचे शिक्षण व आमची जबाबदारी या अंतर्गत पालक मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हमुलाल मुल्ला (वस्ताजी) होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, कुरुंदवाड येथील सहाय्यक शिक्षक मोहम्मदइब्राहिम लक्षमेश्वर, आजऱ्याचे यासीन सय्यद, गडहिंग्लज तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, मुख्याध्यापक अल्ताफ कुमनाळी, फहिमुद्दीन मुल्ला, मुबीन नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मोहम्मदइब्राहिम लक्षमेश्वर म्हणाले, पालकांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊन मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये धाडस निर्माण केले पाहिजे. मोबाईलच्या अतिरेक वापरापासून मुलांना दूर ठेवावे. पालक व शिक्षकांनी मुलांमध्ये सुसंवाद घडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. बदलत्या युगानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवलंब करण्याचे ज्ञानदेखील त्यांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यासीन सय्यद यांनी मुलांना केवळ अल्पशिक्षणावरच न थांबविता त्यांना उच्चशिक्षित करावे असे सांगितले. मौलाना फहिमुद्दीन मुल्ला यांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी असे मत व्यक्त केले. बाळासाहेब मुल्ला यांनी पालकांनी आपल्या व्यवसायात मुलांना गुंतवून न ठेवता त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले. मौलाना मुबीन नदाफ यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार निर्माण करावेत असे सांगितले.
प्रास्ताविक छत्रपती राजर्षी शाहू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलावर वाटंगी यांनी केले. यावेळी शाळेच्या तीस माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थिनी हिना शेख यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील काही आठवणींना उजाळा देत त्यांनी येथील गुरुजनांचे कौतुक केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुबारक नाईकवाडे यांनी मानले.


.jpg)
.jpg)
.jpg)