गुलालाची उधळण, हजारो भक्तांच्या जल्लोषात पालखी डोंगराकडे रवाना
उद्या होणार डोंगरावर यात्रा
छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'भैरीच्या नावानं चांगभलं'चा गजर, गुलाल, फुलांची उधळण व ढोल ताशांच्या निनादात सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. मिरवणुकीने पालखी डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. उद्या शुक्रवार ( दि.१४ ) यात्रेचा मुख्य दिवस आहे.
गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील मंदिरात पुजारी, प्रशासकीय अधिकारी व मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. या मिरवणुकीत मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालखी समोरील सासनकाठ्याना गोंडे बांधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोठे गोंडे आकर्षण ठरले. शिवाजी चौकातून पालखी नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोडवरून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. आज रात्री बारा वाजता श्री काळभैरव देवाची शासकीय पूजा होणार असून पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
उद्या यात्रेचा मुख्य दिवस
उद्या (शुक्रवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागातून लाखो भाविक गर्दी करतात. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रास्थळी जाण्यासाठी गडहिंग्लज आगाराने जादा बस गाड्यांची व्यवस्था केलेली आहे.




