गडहिंग्लज, आजरा चंदगड, भुदरगड तालुक्यात मटका, जुगार अड्डा, दारू विक्रीला परवानगी देण्याची केली मागणी
उपविभागातील अवैध धंद्यांकडे आगळ्यावेगळ्या पद्धतीने वेधले लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज, आजरा चंदगड, भुदरगड तालुक्यात मटका, जुगार अड्डा, दारू विक्रीला परवानगी द्यावी अशा अनोख्या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याने याची चर्चा झाली. सदर निवेदन ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू, गावठी दारू, गांजा, काही कॅफे व लॉजमध्ये छुपा अनैतिक उद्योग राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासनाचे आम्ही वारंवार लक्ष वेधले आहे, मात्र दुर्लक्ष होत आहे. येथील संस्कृती व शांतता या गोष्टींना यामुळे कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये, याच्या आहारी जाऊन युवा पिढी भरकटू नये, अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवेत यासाठी या अवैध धंद्यांना चाप बसवावा हाच मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्यावतीने आम्ही वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करून लक्ष वेधलो आहोत. मात्र या अवैध धंद्यांवर जरब बसविण्यात पोलीस प्रशासन का धजावत आहे? त्यांच्यावर कठोर कारवाई करून हे धंदे कायमस्वरूपी का बंद पडले जात नाहीत? हा सवाल उपस्थित होत असून अवैध धंदे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत या पाठीमागील'अर्थ' काय काढायचा? हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पाडला आहे. या उपविभागातील वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाणाऱ्या गडहिंग्लज शहराची ओळख तर आता 'मटक्याचे शहर' म्हणून होण्याचे बाकी राहिले आहे. कारण महाराष्ट्रसह शेजारील कर्नाटक राज्यातील लोक देखील मटका, जुगार खेळण्यासाठी गडहिंग्लज शहरात येत असल्याचे विदारक चित्र सध्या याठिकाणी आहे. ठिकठिकाणी टपरीवर राजरोसपणे मटका तेजीत सुरू आहे. या अवैध धंद्यातून दररोज करोडो रुपयांची उलाढाल देखील होताना दिसत आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या नादात बेरोजगार तरुण पिढी या अवैध धंद्यांच्या विळख्यात ओढले जात आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गडहिंग्लज उपविभागात बऱ्याच गावांमध्ये काही वर्षांपूर्वी महिलांनी चळवळ उभी करत शासनमान्य देशी दारू दुकाने बंद पाडली होती. मात्र वर्षे दोन वर्षे उलटतात न उलटतात तेवढ्यात यातून पळवाटा काढत या गावांमध्ये छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरु झाली. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील काही ठिकाणी तर एकाच गावात तब्बल तीन ते चार ठिकाणी अवैद्य मार्गाने छुप्या पद्धतीने व पोलीस प्रशासनाच्या मूक संमतीने गोवा बनावटीची व गावठी दारू विक्री होत असल्याची उघडपणे चर्चा सुरू आहे. २१ जानेवारी २०२५ रोजी हलकर्णी येथे रात्री साडेनऊ वाजता क्लब व मटका यामधील अंतर्गत इर्षेतून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. रिकाम्या बाटल्या, विटा व तलवारीचा देखील हाणामारीसाठी वापर झाला होता. अक्षरशः नागरिकदेखील भयभीत झाले होते. येथे सुरू असणारे जुगार व मटका अड्डे यामुळे येथील शांतता भंग पावत आहे. हलकर्णी भागात कोणाच्या आशीर्वादाने हे खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंदेवाल्यांना अभय का दिला जात आहे? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
चंदगडमध्ये तर लॉजवरील अवैध प्रकाराचे व्हिडिओ क्लिपस बाहेर पडले होते. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा झाली होती. यावर आवाज उठवलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावरच गुन्हा दाखल करण्याचा केविलवाणा प्रकार चंदगडमध्ये घडला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाची भीती अवैध धंदेवाल्यांना नाहीतर सर्वसामान्य जनतेलाच जास्त असल्याचे विदारक चित्र गडहिंग्लज उपविभागात आहे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या गडहिंग्लज उपविभागातील मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू या अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासन मूक संमती देऊन जर दुर्लक्ष करत असेल तर मग यापुढे हे धंदे राजरोसपणे, खुल्या व मुक्त वातावरणात चालवण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावी. गोवा राज्यात जसे 'कॅसीनो' मध्ये जुगार खेळला जातो त्याचप्रमाणे गडहिंग्लज शहरात देखील आपल्या परवानगीने मटका व जुगार अड्डा सुरू करण्याची संमती द्यावी. म्हणजे इतर राज्यातील तज्ञ खेळाडूंचे येथील खेळाडूंना मार्गदर्शन होईल व तालुक्यात झपाट्याने याचा प्रसार होईल व झटपट मार्गाने लोक पैसे कमावतील. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असेल तर मग हे उघडपणे चालवण्यासाठी परवानगी देण्यासाठी पोलीस नक्की लक्ष घालतील असाच विश्वास आम्ही व्यक्त करतो अशी अनोखी मागणी करत या अवैध धंद्यांकडे ठाकरे शिवसेना पक्षाने या निवेदनातून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, तालुकाप्रमुख अजित खोत, तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, सुधाकर जगताप, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, तालुका युवा अधिकारी सागर हेब्बाळे, उपशहर प्रमुख मनीष हावळ, गजराज सासणे, माजी तालुकाप्रमुख विलास यमाटे, श्रीशैलाप्पा साखरे यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या सह्या आहेत.


