Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरात भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तीनशे कोटींचा 'सविस्तर प्रकल्प अहवाल' केंद्राला पाठवावा!

भाजपा अभियंता सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे पालिकेला निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तीनशे कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाला पाठविण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी अभियंता. सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभियंता चंद्रकांत सावंत यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन कार्यालयीन अधीक्षक सरिता खोत यांनी स्वीकारले. यावेळी आरोग्य अधिकारी प्रशांत शिवणे उपस्थित होते.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झालेली आहे. याचे अंदाजे क्षेत्र सहा चौरस किमी आहे. मात्र शहरासाठी कोणताही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. खुल्या गटारीचे अस्वच्छ पाणी थेट हिरण्यकेशी नदीत मिसळते. यामुळे नदीच्या पूर्वेकडील दुंडगे, हेब्बाळ, निलजी, नूल, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी आदी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य व नगर विकास मंत्रालय यांच्या खात्याकडून केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा व केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडून या प्रकल्पांसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या शिफारशीने निधी उपलब्ध करण्यासाठी तीनशे कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल नगरपालिकेकडून तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून अभियंता चंद्रकांत सावंत यांनी केली आहे.



शहराच्या चारही बाजूला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आवश्यकच : अभियंता चंद्रकांत सावंत   




गडहिंग्लज शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच नसल्याने शहरासह पूर्वेकडील गावांना याचे गंभीर परिणाम सोसावे लागत आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी देखील झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून भुयारी गटार योजना व शहराच्या चारी बाजूला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणे फारच गरजेचे आहे. गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढ विकास आराखड्यात या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी आरक्षणे दाखविली आहेत. त्या आरक्षणाचे भूसंपादन करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि भुयारी गटार योजना राबविण्यात संदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर यासाठी तीनशे कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाला पाठविण्याची मागणी निवेदनातून केली आहे. हा अहवाल पाठवल्यानंतर आपण खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून सदर निधी मिळविण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे अभियंता चंद्रकांत सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.