गडहिंग्लज (प्रतिनिधी): बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील निंगप्पा प्रकाश हुगाई (वय ४१) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय येथे ही प्रक्रिया पार पडली.
निंगप्प्पा हुगाई यांना चार दिवसापूर्वी अचानक डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने तब्येत बिघडली होती. त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण, उपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी (ता.११) दुपारी निधन झाले.
दरम्यान, निंगप्प्पा यांचे बंधू अनिल हुगाई हे सीपीआर रुग्णालयातच रक्तपेढी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी चर्चा करून निंगप्प्पा यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला त्यांनी कळविले. तातडीने ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या टीमला पाचारण करण्यात आले. सीपीआर व ॲस्टरच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली
निंगप्प्पा हे इचलकरंजी येथे गेली पंधरा वर्षे सूतगिरणीत काम केले आहे. कोरोनाच्या काळात ते बुगडीकट्टी या आपल्या मूळ गावी परतले होते. त्यामुळे सध्या ते गावातच राहत होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व भाऊ असा परिवार आहे.

