श्री काळभैरव पालखी सोहळ्यातील मिरवणुकीचे ठरणार मुख्य आकर्षण
उपराटे परिवार यांचा दहा फुटी, राजे शिवछत्रपती ग्रुप, आमदार शिवाजीराव पाटील यांचा आठ फुटी गोंडा
उद्या पालखी सोहळा ; १४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस
![]() |
| गडहिंग्लज : अकरा फुटी गोंड्यांवर अखेरचा हात फिरवताना कारागीर तौफिक अत्तार. दुसऱ्या छायाचित्रात श्री काळभैरव देवाची मूर्ती. |
गडहिंग्लज (संतोष नाईक): गडहिंग्लजचे ग्रामदैवत व सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची यात्रा शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील अत्तार कुटुंबीय भाविकांनी सांगितलेले तब्बल ११ फुटी तीन मोठे गोंडे तयार केले आहेत. हे गोंडे कोकण मिल्क सप्लायर्सचे स्वप्निल चौगुले, नदीवेसचा राजा, खंडोबा तालीम मंडळ यांचे तर पालखीचे मानकरी उपराटे परिवार यांचा दहाफुटी गोंडा आहे. सर्वात मोठे हे गोंडे उद्याच्या पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागासह सिंधुदुर्ग, गोवा येथील लाखो भाविक दरवर्षी गडहिंग्लजला येतात. दरवर्षी यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी गडहिंग्लज शहरातील श्री काळभैरव मंदिरातून मिरवणुकीने पालखी बड्याचीवाडी गावच्या डोंगरावरील मंदिराकडे रवाना होते. या पालखी मिरवणुकीत मानाच्या सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे. हे गोंडे तयार करण्याचे काम गडहिंग्लजमधील बुरुड गल्लीतील खुतबुद्दीन अत्तार कुटुंबीय दरवर्षी करतात. हे गोंडे वीस रुपयांपासून ते सहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदाही अत्तार कुटुंबीयांनी गोंडे तयार केले असून यावर आता ते अंतिम हात फिरवत आहेत. यावर्षी स्वप्निल चौगुले, नदीवेसचा राजा मंडळ, खंडोबा तालीम मंडळ यांचे अकरा फुटी गोंडे, पालखीचे मानकरी उपराटे परिवार, नरवीर उमाजी नाईक मंडळ यांचे दहा फुटी, राजे शिवछत्रपती ग्रुप, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा आठ फुटी गोंडा, गडहिंग्लज अर्बन बँकेचा पाच फुटी गोंडा यंदाच्या पालखी मिरवणुकीतील आकर्षण ठरणार आहेत.
गोंडे तयार करणारी अत्तार कुटुंबीयांची चौथी पिढी
श्री काळभैरव यात्रेसाठी गोंडे तयार करणारी गडहिंग्लजमधील अत्तार कुटुंबीयांची आता चौथी पिढी कार्यरत आहे. अत्तार कुटुंबियातील खुतबुद्दीन, तौफिक, नियाज, सद्दाम, सर्फराज, अशिफ हे सर्वजण गोंडे मोठ्या भक्तीभावाने तयार करतात. गोंडे तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून त्यावर ते अखेरचा हात फिरवत आहेत.
सासन काठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा
गडहिंग्लजच्या श्री काळभैरव देवाचे मंदिर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील बड्याचीवाडी गावच्या हद्दीतील डोंगर कपारीत आहे. या ठिकाणीच मुख्य यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकात असणाऱ्या श्री काळभैरव मंदिरातून सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक निघते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी समस्त गडहिंग्लजकर हजारो संख्येने उपस्थित असतात. हा सोहळा अद्भुत असतो. यावेळी पालखीच्या पुढे असणाऱ्या सासनकाठ्यांना भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने गोंडे बांधले जातात. हा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर ही पालखी मिरवणुकीने मानकरी, हक्कदार व पंचांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात डोंगरावरील मंदिराकडे मार्गस्थ होते. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी यात्रा संपन्न होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील तयारी सुरू आहे. एसटी महामंडळानेही यात्रेसाठी खास बसेसची सोय केली आहे.





