Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील नेत्रदान चळवळीचा २४ रोजी वर्धापनदिन

आदर्श गाव संकल्प समितीचे पोपटराव पवार प्रमुख पाहुणे


अत्याळ येथे कार्यक्रम ; नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा होणार गौरव





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरु असलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा बारावा वर्धापनदिन सोमवारी (ता.२४) होणार आहे. अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे सायंकाळी सातला हा कार्यक्रम होईल. यंदाच्या वर्धापनदिनासाठी राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात वर्षभरात झालेल्या १३ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे.




अत्याळ या गावात २०१२ मध्ये नेत्रदान चळवळीचा प्रारंभ झाला. वर्षागणिक चळवळीचा परिघ विस्तारत आहे. आतापर्यंत २२ गावातून १०८ व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने आयबँकही मंजूर केली आहे. शिवाय नेत्रप्रत्यारोपणातून दृष्टी देता येत नाही अशा अंधांसाठी दीड वर्षांपूर्वी अंधांचे रोजगार केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी सध्या १० अंध व्यक्ती काम करतात. त्यांच्याकडून एलईडी बल्ब, लायटींग माळा, आकाश कंदील, कापडी पिशव्या बनविल्या जात आहेत.


दरम्यान, नेत्रदान चळवळीचा सोमवारी वर्धापनदिन होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्यभरातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत दरवर्षी वर्धापनदिनाचा कार्यक्रम होतो. यंदा ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवा आयाम देणारे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांचीही उपस्थिती आहे.



श्री. पवार यांच्या हस्ते अक्काताई दड्डीकर, रुक्मिणी मांगले, आनंदा सुतार (ऐनापूर), महारुद्र शिंत्रे, अनिल रेगडे, मलगोंडा पाटील (भडगाव), निवृत्ती मोहिते, हरी पाटील (अत्याळ), वसंत ढवळ (आजरा), बाबुराव जाधव (हंदेवाडी), पांडुरंग जाधव (करंबळी), शांताबाई पाटील (हरळी बुद्रूक), निंगाप्पा हुगाई (बुगडीकट्टी) या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे.  कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



ग्रामविकासाचा मिळणार मंत्र...


पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार (जि. अहिल्यानगर) या गावाचा कायापालट करीत संपूर्ण राज्याला स्वावलंबी आणि संपन्न ग्रामजीवनाचा आदर्श दिला आहे. समर्पण, सामाजिक भान आणि परिवर्तनाची जिद्द असलेले श्री. पवार ग्रामविकासात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. नेत्रदान चळवळीच्या वर्धापनदिनानिमित्त श्री. पवार यांच्याकडून ग्रामविकासाचा मंत्र मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.