अडगळीतील बोळात टाकले ; अज्ञाताच्या निर्दयी कृत्याने ग्रामस्थांमधून संताप
हलकर्णीकर महिलांनी अर्भकाला दिली मायेची उब ; अर्भक सुखरूप

हलकर्णी : १) कॅरीबॅगमध्ये गुंडाळून बोळात टाकलेल्या या गोंडस व निरागस अर्भकला हलकर्णीतील महिलांनी मायेची उब दिली. २) याच ठिकाणी अडगळीत या अर्भकाला टाकण्यात आले होते.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथे मध्यवस्तीतील एका गल्लीजवळ शेळी बांधण्यासाठी उभारलेल्या पत्रा शेडच्या बाजूच्या अडगळीतील बोळात अज्ञाताने प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून टाकलेले स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान राखत वेळीच या अर्भकाची काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केल्याने अर्भक सुखरूप आहे. याची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हलकर्णी येथे पानारी गल्लीच्या शेवटी शेतवडीत असणाऱ्या एका इमारतीच्या बाजूला रामगोंडा नावलगी यांनी शेळी बांधण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास शेडकडे गेलेल्या रामगोंडा यांच्या पत्नीला त्या शेडच्या बाजूला बोळात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तेथे पाहिले असता कोणीतरी प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून स्त्री जातीचे अर्भक टाकल्याचे आढळले. याची कल्पना त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या महिलांना दिली. सर्व महिलांनी तातडीने त्या अर्भकला उचलून घेत मायेची ऊब दिली. गरम पाण्याने अंघोळ घालून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुखरूप सुपूर्द केले. येथील आरोग्य केंद्रात त्या अर्भकावर उपचार करून दक्षता घेण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. गोंडस व निरागस बाळाला पाहून सर्वांची मने हेलवली. अमानुषपणे अर्भकाला उघडयावर टाकून निर्दयी कृत्य करणाऱ्यांबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, याबाबतची माहिती पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात कोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याची देखील चौकशी करण्यात आली. तपासाच्या दृष्टीने पोलिसांना त्यांनी मार्गदर्शन केले. सदर अर्भकाचे पालन पोषण व देखभाल न करण्याच्या उद्देशाने व त्याच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठी उघड्यावर टाकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबतची फिर्याद रामगोंडा उर्फ दूंडाप्पा नावलगी यांनी पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आज्ञाता विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार करत आहेत.

