Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. घाळी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत जागृती हायस्कूलला विजेतेपद

कोल्हापूरच्या आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलला उपविजेतेपद 


'साधना' ला तृतीय तर आरदाळ हायस्कूलने चतुर्थ क्रमांक पटकाविला


स्पर्धावीर समर्थ निकम तर मालिकावीर अथर्व खवरे





गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूल तर्फे डॉ. घाळी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. स्पर्धेत बारा संघांनी सहभाग नोंदविलेला होता. पार्वती हायस्कूल औरनाळच्या प्रशस्त मैदानावर स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जागृती हायस्कूलला विजेतेपद तर कोल्हापूरच्या आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलला उपविजेतेपद मिळविले. 'साधना' ला तृतीय तर आरदाळ हायस्कूलने चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धावीरचा समर्थ निकम तर मालिकावीरचा बहूमान अथर्व खवरे याने पटकविला.



स्पर्धेचे उदघाटन विद्या प्रसारक मंडळाचे संचालक महेश घाळी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक प्रा. चिदानंद कानडे, ए.आर. मिरजे, सुशांत घाळी, उदय पवार, अजित कांबळे,सागर मेटके उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख संपत सावंत यांनी केले. उपांत्य सामन्यात आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल कोल्हापूरने माध्यमिक विद्यालय आरदाळ चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागृती हायस्कूलने रंगतदार सामन्यात साधना हायस्कूल वर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. साधना व आरदाळ यांच्यामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सामना झाला. साधना हायस्कूलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरदाळ हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ५ बाद ५६धावांचे आव्हान दिले. आरदाळच्या समर्थ ह्राटवळ यांने १६धावा, दत्तराज गुरव यांने १५ धावांची खेळी केली. साधनाच्या पृथ्वीराज देसाई, तेजस गावित यांच्या आक्रमक फलंदाजीने ८.४षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात  ५६ धावा काढून विजय मिळवला.




अंतिम सामना आयुर्विन हायस्कूल कोल्हापूर व जागृती यांच्यामध्ये अतितटीचा सामना झाला. नाणेफेक जिंकून जागृतीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोशन दिवटणकर यांने २१ धावा, अथर्व खवरे १८ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर १५ षटकात ९ बाद ८७ धावांचे कडवे आव्हान दिले. जागृतीच्या कर्णधार नैतिक तेलवेकर, प्रीतम दिवटे यांनी अनुक्रमे तीन व दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जागृतीने १२.२ षटकात ६बाद ८८ धावा काढून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. जागृतीचा समर्थ निकम यांने दोन षटकार व एका चौकाराच्या सहाय्याने २८ धावांची झुंजार खेळी केली..सुरज खमलेट्टी याने नाबाद १९धावांची उत्कृष्ट खेळी करून तिसऱ्यांदा जागृतीने विजेतेपदाची हॅट्रिक मिळवली.




समर्थ ह्राटवळ ( आरदाळ), यश घुगरे (साधना) आदित्य चौगुले(आरदाळ ), प्रीतम दिवटे (जागृती) यांना प्रत्येक सामन्यातील सामनावी तर उत्कृष्ट फलंदाज सुरज खमलेट्टी, अंतिम सामन्यातील सामनावीर समर्थ निकम (जागृती) व मालिकावीर अथर्व खवरे (कोल्हापूर)यांना आकर्षक चषक, मेडल्स, स्पोर्ट्स किट व प्रमाणपत्र संस्थेचे संचालक महेश घाळी, मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, शिवाजी अनावरे प्रवीण पाटील, सुशांत घाळी उदय पवार यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून महादेव चिलमी, मोहीन मकानदार ऑनलाइन स्कोरर म्हणून जगदीश गावित, समालोचक भीमसेन दिवटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रकाश हरकारे यांनी तर शिवाजी अनावरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.