कवी संमेलन, बालनाट्य, कथाकथन व नाट्यछटा सादरीकरण असा संयुक्त कार्यक्रम
मुंबई (प्रतिनिधी) : उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पुंडपाळ यांच्या ‘गवसणी आकाशाला’ या बालकुमार कथासंग्रहाचे प्रकाशन वांद्रे, मुंबई येथील नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड आणि जे. के. मीडियाच्या प्रकाशिका व लेखिका ज्योती कपिले यांच्याहस्ते व साहित्यिक रवींद्र सोनवणे (जळगाव), कवी वीरभद्र मिरेवाड (नायगाव-नांदेड), प्रतिभा जगदाळे (सांगली), श्रीकांत पेटकर (कल्याण), मोहन काळे (नवी मुंबई) यांच्या उपस्थितीत झाले.
साहित्यिक सदानंद पुंडपाळ यांनी कथा, कादंबरी, कविता, विडंबनकविता, दोहे, चारोळी, बालकविता, चरित्र, समीक्षा, वैचारिक स्फुट अशा विविध प्रकारचे लेखन केले असून नुकतेच चिंचवड-पुणे येथील प्रणाली प्रकाशनाने त्यांची ‘चाहूल सूर्यास्ताची’ व ‘गवसणी आकाशाला’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. १९१७ साली स्थापन झालेली वांद्रे (प) येथील नॅशनल लायब्ररी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे लायब्ररीत बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड अध्यक्षपदी होते. याचवेळी श्री. पुंडपाळ यांच्या ‘गवसणी आकाशाला’ या बालकुमार कथासंग्रहाचे प्रकाशन एकनाथ आव्हाड आणि ज्योती कपिले यांच्याहस्ते व साहित्यिक रवींद्र सोनवणे, कवी वीरभद्र मिरेवाड, प्रतिभा जगदाळे, श्रीकांत पेटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कवी संमेलन, बालनाट्य, कथाकथन व नाट्यछटा सादरीकरण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच संमेलनाचा एक भाग असलेल्या कवी संमेलनातही सदानंद पुंडपाळ कवी म्हणून सहभागी झाले होते. यावेळी नॅशनल लायब्ररीचे अध्यक्ष दीपक पडवळ, कार्यवाह प्रमोद महाडिक, बी. पी. ई. शाळेचे मुख्याध्यापक भानुदास केसरे, नॅशनल लायब्ररीचे इतर पदाधिकारी, बी. पी. ई शाळेचे विद्यार्थी आणि अनेक मान्यवर संस्थाचालक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

