सेवानिवृत्त मराठी विषय शिक्षकांचाही होणार सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघ व पंचायत समिती गडहिंग्लज यांच्या वतीने सोमवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी 'परीक्षेला जाता जाता' या विषयावर महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे पुणे शहराध्यक्ष भरत सुरसे यांचे व्याख्यान व सेवानिवृत्त मराठी विषय शिक्षकांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे. गडहिंग्लज येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकरराव शिंदे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर राहणार असून गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन गडहिंग्लज तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

