गडहिंग्लजला मनसेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री काळभैरव देवाचा पालखी मार्ग तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी मनसेच्या वतीने गडहिंग्लजचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केले आहे. सदर निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दिनांक १३ व १४ फेब्रुवारी रोजी पार पडत आहे. १४ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणेजच १३ रोजी सायंकाळी गावातील मंदिरातून पालखी मिरवणूकीने बड्याचीवाडी डोंगरावरील मंदिराकडे रवाना होते. शहरातील हा पालखी सोहळा दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. ही पालखी मिरवणूकीने शहरातून डोंगराकडे जाताना सोबत जाणारे मानकरी, हक्कदार, भक्तगण हे अनवाणी जातात. मात्र पालखीचा काही मार्ग हा खडतर असल्याने त्यांच्या पायाला इजा होऊ शकते. त्यामुळे हा पालखीचा मार्ग तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. याचा विचार करून प्रशासनाने लवकरात लवकर हा मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे, मनसेचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवा मठपती, वीरेंद्र चौगुले यांच्यासह इतर उपस्थित होते.

