पोलीस प्रशासन, नगरपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक
पाणीपट्टी माफ बाबत नगरपंचायत लेखी देत नसल्यामुळे मोर्चा काढणारच : अध्यक्ष परशुराम बामणे
आजरा : आजरा शहरातील पाणी प्रश्नासाठी उद्या होणाऱ्या सर्व पक्षीय महामोर्चाच्या संदर्भात पोलीस प्रशासन, नगरपंचायत अधिकारी, अन्याय निवारण समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अन्याय निवारण समितीच्या मागण्यांबद्दल सकारात्मक चर्चा झाली. परंतु समितीची जी मुख्य मागणी आहे ती म्हणजे दोन वर्ष वेळेवर व आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच पाणी मिळाले आहे त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी माफ करावी. मात्र नगरपंचायत अधिकारी लेखी देऊ शकत नाहीत असे म्हटल्याने उद्याचा मोर्चा हा होणारच असे ठरले.
ठेकेदार व नगरपंचायत अधिकारी यांनी काम पूर्ण होण्यासाठी अजून दीड महिना लागेल असे सांगितले याचा अर्थ असा की काल जो खुलासा केला होता तो खोटा आहे असे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी स्पष्ट केले. सर्व गटतट बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या पाण्याच्या, रस्त्याच्या व इतर समस्यांच्या पाठपुराव्यासाठी आजरेकर रहिवाशांनी मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन अन्याय निवारण समितीने केले आहे.
यावेळी परशुराम बामणे, विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, वाय बी चव्हाण, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, सुधीर कुंभार, दयानंद भोपळे, बंडोपंत चव्हाण, सुभाष नाईक, हेमंत गिलबिले, तानाजी चव्हाण यांच्यासह इतर उपस्थित होते.


